मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुप्रतीक्षित बारामती दौरा अखेर निश्चित झाला असून, २४ ऑक्टोबर रोजी ते विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात येणार आहेत. या दौऱ्यात भगवान गौतम बुद्ध यांच्या स्मृती आणि विचारांना समर्पित करण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संस्थेची पाहणी आणि त्यासंदर्भातील सादरीकरणही पंतप्रधानांसमोर होण्याची शक्यता आहे.
https://www.prahaar.in/2026/09/24/farmers-left-out-of-the-loan-waiver-scheme-will-also-receive-benefits-chief-minister-fadnavis-announces-in-washim/
मोदी यांच्या बारामती दौऱ्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. दौऱ्याची तारीख निश्चित झाल्यानंतर विद्या प्रतिष्ठान परिसरात तयारीला वेग आला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी बारामतीतील नक्षत्र गार्डन येथे उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळा’ची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या मुख्यालयात पदाधिकारी आणि विश्वस्तांसोबत बैठक घेऊन पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेतला.
या बैठकीला युवा नेते युगेंद्र पवार, विश्वस्त विठ्ठल मणियार, प्रताप पवार, कृषी विकास प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलवडे, विश्वस्त किरण गुजर, सचिव नीलिमा गुजर आदी उपस्थित होते. पवार यांच्या भेटीदरम्यान विद्या प्रतिष्ठानमध्ये असलेल्या एआय सुविधांचीही चर्चा झाली.
https://www.prahaar.in/2026/09/24/three-workers-died-after-a-factory-wall-collapsed-in-the-wada-the-victims-included-two-women-and-one-man/
विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेले ‘प्रेरणास्थळ’ तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या स्मृती आणि विचारांना समर्पित आहे. शांतता, समता आणि मानवतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या स्थळाची उभारणी करण्यात आली आहे. येथे भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा तसेच विविध महापुरुषांच्या चित्रांद्वारे त्यांच्या कार्याची आणि विचारांची माहिती देण्यात आली आहे. याच ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.