Nashik Kumbh Mela 2027 : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. कुंभमेळ्याचा औपचारिक शुभारंभ 31 ऑक्टोबर रोजी होणार असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत धर्मध्वजारोहणाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी सायंकाळी दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीची भव्य आरती होणार आहे. या आरतीमध्ये तब्बल साडेसहा हजार आदिवासी सहभागी होणार असल्याचे नियोजन आहे.
दुपारी धर्मध्वजारोहण, सायंकाळी गोदा आरती
कुंभमेळ्याची सुरुवात धर्मध्वजारोहणाने करण्याची परंपरा आहे. त्यानुसार 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी शंकराचार्य आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत धर्मध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर सायंकाळी 7 वाजता गोदावरी आरती आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे 15 हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असून, राष्ट्रपतींसोबत साडेसहा हजार आदिवासी आरतीमध्ये सहभागी होणार आहेत.
गोदा आरतीसोबतच या सोहळ्यात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. दीपप्रज्वलन, शंखनाद, आकर्षक रोषणाई आणि दिव्य संध्या यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. राष्ट्रपतींची उपस्थिती लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था आणि राजशिष्टाचाराच्या दृष्टीने आवश्यक तयारीलाही सुरुवात करण्यात आली आहे.
https://www.prahaar.in/2026/09/24/nashik-ganesh-visarjan-2026-major-traffic-changes-on-anant-chaturdashi-find-out-about-closed-roads-and-alternative-routes/
रामकुंड, कुशावर्त आणि नील पर्वतावर धार्मिक कार्यक्रम
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड, कुशावर्त आणि नील पर्वत परिसरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन सुरू आहे. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात माहिती दिली आहे. पुढील वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अमृतस्नानाचे मुहूर्त असले तरी सिंहस्थाच्या तयारीला आणि धार्मिक कार्यक्रमांना याच वर्षी सुरुवात होणार आहे.
अनेक मान्यवरांची उपस्थिती
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहण्याचे नियोजन आहे. तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अन्य राज्यांचे मुख्यमंत्री यांनाही निमंत्रित करण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे. काही मान्यवर नाशिक, तर काही त्र्यंबकेश्वर येथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणासह नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघांच्या माध्यमातून मान्यवरांची यादी तयार करून निमंत्रण देण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा प्रकारे 31 ऑक्टोबरचा धर्मध्वजारोहण सोहळा आणि गोदा आरती सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भव्य प्रारंभाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.