मुंबई : अभिनेता अजय देवगणच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्यावरून नवा वाद समोर आला आहे. कपोळ को- ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील त्याच्या मालमत्तेत प्रस्तावित असलेल्या सलून आणि स्पाच्या कामाबाबत मुंबई महापालिकेच्या के- वेस्ट विभागाने काम थांबवण्याची म्हणजेच ‘स्टॉप – वर्क’ नोटीस बजावली आहे. या जागेच्या व्यावसायिक वापरासाठी महापालिकेच्या के-वेस्ट विभागाकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही, असे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (BMC Notice)
https://www.prahaar.in/2026/09/24/nagpur-crime-a-minor-quarrel-between-children-ends-in-bloodshed-36-year-old-man-dies-after-being-attacked-with-an-iron-rod/
मिळालेल्या माहितीनुसार, बंगल्यात सलून आणि स्पा बनवण्यासाठी काही बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक हाउसिंग सोसायटीने याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मालमत्ता मालकांकडे या बांधकामाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे आणि परवानग्या सादर करण्याची मागणी केली. मात्र, वेळेत योग्य कागदपत्रे सादर न केल्यामुळे महापालिकेने तत्काळ प्रभावाने हे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. (Ajay Devgan)
या संपूर्ण प्रकरणात देवगण कुटुंबाने आपली बाजू मांडण्यासाठी पालिकेकडे 4 आठवड्यांचा वेळ मागितल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, देवगण कुटुंबाच्या प्रतिनिधींनी असा दावा केला आहे की, या प्रस्तावित कामासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या आणि मंजुरी आधीच संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता या परवानग्यांची अधिकृत कागदपत्रे महापालिकेकडे कधी सादर केली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Stop Work Notice)
दरम्यान, हा बंगला भाड्याने देण्याबाबत सोसायटीचा कोणताही आक्षेप नसून, केवळ त्याच्या व्यावसायिक वापरावर विरोध असल्याचे सांगण्यात आले आहे. ही एक पूर्णपणे निवासी सोसायटी असल्याने बंगल्याचा वापर सलून किंवा स्पासारख्या व्यावसायिक कामासाठी करता येतो का, असा सवाल सोसायटीने उपस्थित केला आहे. याशिवाय सोसायटीने महापालिकेकडे या ठिकाणच्या स्ट्रक्चरल काम, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल यंत्रणा, पार्किंग, साईनेज आणि अग्निसुरक्षेशी संबंधित परवानग्यांची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे. आता महापालिकेकडून सर्व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतरच या प्रकरणावर पुढील योग्य ती कारवाई केली जाईल. ( Bollywood News)