गुवाहाटी : भारतातील निसर्ग आणि कीटकजगताच्या अभ्यासातून एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आसाममधील प्रसिद्ध दिब्रू-सैखोवा राष्ट्रीय उद्यानात (Dibru-Saikhowa National Park) संशोधकांना गांधीलमाशीची एक अत्यंत दुर्मीळ आणि आजवर अज्ञात असलेली प्रजाती शोधण्यात यश आले आहे. भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या (Scientists from the Zoological Survey of India ) तज्ज्ञांनी या नव्या कीटकाचा शोध लावला असून, ओरिएंटल जैवभौगोलिक क्षेत्रात अशा प्रकारच्या कीटकाची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या प्रजातीला ‘ऑक्सिसर्फस नरेंद्रानी’ (Oxyserphus narendrani) असे नाव देण्यात आले आहे.
https://www.prahaar.in/2026/09/23/thane-building-fire-14-electrical-meters-gutted-in-ground-floor-meter-box-room/
असा झाला या दुर्मीळ प्रजातीचा शोध
हा शोध नोव्हेंबर २०२४ मध्ये लावण्यात आला. ZSI चे संशोधक रुपम देबनाथ आणि केलोथ राजमोहन हे दिब्रू-सैखोवा उद्यानात संशोधन करत असताना त्यांनी कीटकांना आकर्षित करण्यासाठी पिवळ्या रंगाच्या पाण्याने भरलेल्या ताटलीचा एक विशेष सापळा वापरला होता. या सापळ्यात अडकलेल्या एका सूक्ष्म कीटकाची वैज्ञानिक तपासणी केली असता, ती ‘प्रॉक्टोटुपिडी’ या परजीवी गांधीलमाशीच्या कुळातील एक नवी प्रजाती असल्याचे स्पष्ट झाले. हा गट ‘डार्क टॅक्सा’ म्हणजेच अत्यंत कमी अभ्यास झालेल्या जीवसमूहाचा भाग मानला जातो. जागतिक पातळीवरही या प्रजातीचे कीटक दुर्मिळातील दुर्मिळ समजले जातात.
https://www.prahaar.in/2026/09/23/visit-the-fields-of-drought-affected-farmers-and-inspect-the-damage/
कशी आहे ‘ऑक्सिसर्फस नरेंद्रानी’ ?
या गांधीलमाशीचे शरीर अत्यंत सूक्ष्म असून तिची लांबी अवघी ३.३ मिलिमीटर आहे. तिचे डोके काळ्या रंगाचे, शरीर तपकिरी-काळे आणि पाय चमकदार पिवळ्या रंगाचे आहेत. परजीवी गांधीलमाशांमध्ये बऱ्याचदा समानता आढळत असल्याने या प्रजातीची सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे सखोल पाहणी करण्यात आली. ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या अशाच प्रजातीशी तुलना केली असता, या भारतीय प्रजातीच्या छातीच्या बाजूला एकच आडवा चर असल्याचे दिसून आले. तसेच, तिचे अंडे घालण्याचे अवयव आणि पंखांवरील ठिपक्यांची रचना इतर प्रजातींपेक्षा वेगळी आहे.
ज्येष्ठ शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ दिले नाव
या नव्या प्रजातीला ‘ऑक्सिसर्फस नरेंद्रानी’ हे नाव भारतातील परजीवी गांधीलमाशांच्या अभ्यासात अमूल्य योगदान देणारे दिवंगत शास्त्रज्ञ डॉ. टी. सी. नरेंद्रन यांच्या आदरार्थ देण्यात आले आहे. या नव्या शोधाआधी भारतात या कुळातील केवळ आठ प्रजातींची अधिकृत नोंद होती. देशातील विविध नैसर्गिक अधिवासांमध्ये जर अजून व्यापक संशोधन आणि सर्वेक्षण केले, तर कीटक जगतातील अनेक अज्ञात आणि अनोखे रहस्य समोर येऊ शकतात, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.