दिल्ली : दिल्लीतील कालकाजी मंदिर परिसरातून अल्पवयीन मुलीवर अत्यावर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 17 वर्षीय मुलीला आणि तिच्यासोबत असलेल्या मित्राला काही जणांनी पार्कमध्ये अडवल्याचा आरोप आहे. आरोपींनी स्वतःला पोलीस कर्मचारी असल्याचे सांगत दोघांना धमकावले. त्यानंतर मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून, इतर दोघांचा शोध सुरू आहे. (Delhi Crime)
https://www.prahaar.in/2026/09/22/girl-intercepted-in-the-middle-of-the-road-and-inappropriately-touched-a-wave-of-outrage-follows-the-shocking-visuals-in-the-viral-video/
नेमकं काय घडलं?
21 सप्टेंबर रोजी संध्याकाळी दिल्लीतील कालकाजी मंदिर परिसरात ही घटना घडली. संबंधित मुलगी आपल्या मित्रासोबत कालकाजी मंदिरात गेली होती. दर्शन घेतल्यानंतर दोघेही मंदिराजवळील एका पार्कमध्ये वेळ घालवण्यासाठी गेले होते. याच ठिकाणी 25 ते 30 वयोगटातील तीन जण त्यांच्याजवळ आले.
या तिघांनी आपण पोलीस असल्याचे सांगून मुलगी आणि तिच्या मित्राला धमकावल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यापैकी एका व्यक्तीकडे चाकू आणि बंदूक असल्याचे सांगून धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर मुलीला एका बाजूला नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
घटनास्थळावरून आरोपी फरार
घटनेनंतर आरोपी तेथून फरार झाले. रात्री सुमारे 8.45 वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिच्या जबाबाच्या आधारे पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान एका संशयिताचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयिताच्या पायाला गोळी लागली आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील इतर दोन संशयितांचा शोध सुरू आहे.