मुंबई : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात यंदाच्या आशिया कपनंतर एक अनोखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही भारतीय संघांनी आशिया कपचे विजेतेपद पटकावले असले, तरी दोन्ही विजेतेपदांच्या ट्रॉफी अद्याप भारतीय संघांकडे आलेल्या नाहीत. आता या मुद्द्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव देवजित सैकिया यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. दोन्ही ट्रॉफी अखेर मुंबईतील BCCIच्या मुख्यालयात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्यासाठी निश्चित कालमर्यादा सांगता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Asia Cup Trophy)
पुरुष संघाने २०२५ मध्ये ट्रॉफी स्वीकारली नव्हती
२०२५ मध्ये दुबईत झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. मात्र, भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारली नव्हती. (Asia Cup Trophy)
या घटनेनंतर ट्रॉफी भारतीय संघाला देण्यात आली नाही आणि ती नक्वी यांच्याकडेच राहिली. त्यानंतर या ट्रॉफीच्या हस्तांतरणाचा मुद्दा कायम चर्चेत राहिला.
https://www.prahaar.in/2026/09/19/india-under-19-team-defeats-australia-by-7-runs-brilliant-performances-by-dravids-and-sehwags-sons/
महिला संघानेही स्वीकारला नाही चषक
२०२६ मध्ये भारतीय महिला संघाने आशिया कपचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला. मात्र, यावेळीही पुरस्कार वितरणावेळी नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यात आली नाही. त्यामुळे महिला संघाची विजेतेपदाची ट्रॉफीही भारतात आली नाही. (Asia Cup Trophy)
BCCI सचिव म्हणाले, ‘दोन्ही ट्रॉफी मुंबईत येतील’
१८ सप्टेंबर रोजी झालेल्या BCCIच्या ९५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर देवजित सैकिया यांनी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली. “आम्हाला आशा आहे की आशिया कपच्या ट्रॉफी एक दिवस नक्की येतील. मी वेळ सांगू शकत नाही, पण दोन्ही ट्रॉफी BCCIच्या मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील मुख्यालयात असतील,” असे सैकिया यांनी सांगितले. (Asia Cup Trophy)
https://www.prahaar.in/2026/09/18/major-decisions-regarding-the-ipl-budget-and-centenary-celebrations-at-the-bccis-annual-meeting-here-are-10-key-points/
पुढचा मुद्दा एशियन गेम्सचा
दरम्यान, जपानमध्ये १९ सप्टेंबरपासून एशियन गेम्सला सुरुवात झाली आहे. क्रिकेटचे सामने मात्र आशिया कपप्रमाणे ACCच्या अंतर्गत होत नाहीत. एशियन गेम्सचे आयोजन ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाच्या (OCA) चौकटीत होते. त्यामुळे आशिया कपमधील ट्रॉफी वितरणाचा प्रसंग एशियन गेम्समध्ये तसाच घडेल, असे मानता येत नाही.
नक्वींचा ACC अध्यक्ष म्हणून कार्यकाळ
मोहसिन नक्वी सध्या ACCचे अध्यक्ष असून त्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२७पर्यंत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आगामी काळात ACCच्या नेतृत्वात बदल झाल्यास ट्रॉफी हस्तांतरणाचा प्रश्न कसा सुटतो, याकडेही लक्ष लागले आहे. (Asia Cup Trophy)
आता दोन्ही आशिया कप ट्रॉफी नेमक्या कधी भारतात येतात आणि त्या BCCIच्या मुंबईतील मुख्यालयात कधी पोहोचतात, याबाबत उत्सुकता कायम आहे.