Nashik : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन 17 वर्षीय विद्यार्थ्यांचा मोसम नदीच्या बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. नामपूर येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या गणपतीचे विसर्जन केल्यानंतर ही दुर्घटना घडली. अथर्व दीपक पगार (रा. उतराणे) आणि प्रसाद दादाजी वाघ (रा. नामपूर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.
विसर्जनानंतर बंधाऱ्याजवळ थांबले
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक पाटील यांच्या खासगी कोचिंग क्लासमध्ये गणपतीची मूर्ती बसवण्यात आली होती. पाचव्या दिवशी आरती झाल्यानंतर विद्यार्थी आणि इतरांनी मोसम नदीत गणपतीचे विसर्जन केले. विसर्जनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर इतर विद्यार्थी परतले. मात्र, अथर्व आणि प्रसाद यांना पोहण्याचा मोह झाल्याने ते बंधाऱ्याजवळच थांबले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात बुडू लागले.
https://www.prahaar.in/2026/09/19/nashik-manisha-jejurkar-case-no-relief-from-the-supreme-court-dr-nilesh-jejurkar-finally-in-police-custody/
दोघांना बुडताना पाहून त्यांचा तिसरा मित्र विरेन अहिरे याने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान राखत त्याला रोखले. त्यामुळे विरेनचा जीव वाचला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी तातडीने बंधाऱ्यात उतरून अथर्व आणि प्रसाद यांना पाण्याबाहेर काढले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
कुटुंबीयांचा आक्रोश; संचालकांवर आरोप
दोन्ही विद्यार्थ्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच रुग्णालयात कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. कोचिंग क्लास संचालकांच्या कथित दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाची दखल घेत जायखेडा पोलिसांनी कोचिंग क्लास संचालक अशोक पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या दुर्घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.