Jalgaon Crime News : जळगाव शहरालगत असलेल्या बांभोरी पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी घेतलेल्या विवाहितेचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. जयश्री चौधरी असे या महिलेचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुमारे 70 ते 80 फूट उंच पुलावरून महिलेने नदीत उडी घेतल्याची माहिती मिळताच बचाव पथक आणि स्थानिक नागरिकांनी शोधमोहीम सुरू केली.
रात्री अंधारामुळे शोधमोहीम थांबवली
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नदीपात्रात तातडीने शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत नदी आणि पुलाच्या परिसरात शोध घेण्यात आला. मात्र, अंधार तसेच नदीपात्रातील परिस्थितीमुळे रात्री शोधकार्य थांबवण्यात आले. त्यानंतर सकाळी 8 वाजल्यापासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. परिसरातील अनुभवी पोहणाऱ्यांचीही मदत घेण्यात येत असून नदीपात्रातील विविध भाग तपासले जात आहेत.
https://www.prahaar.in/2026/09/19/jalgaon-crime-news-married-just-a-month-ago-young-engineer-commits-suicide-by-jumping-in-front-of-a-train-reason-unclear/
15 तासांपासून शोध सुरू
महिलेचा शोध घेऊन जवळपास 15 तासांचा कालावधी उलटला असला तरी अद्याप तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. नदीतील पाण्याचा प्रवाह आणि नैसर्गिक अडथळ्यांमुळे बचाव पथकाला शोधकार्यात अडचणी येत आहेत. महिलेने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या घटनेमागील कारणाचा तपासही केला जात आहे.
नदीपात्रात युद्धपातळीवर शोध
सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आलेल्या शोधमोहीमेत पोहणाऱ्यांकडून नदीपात्रातील वेगवेगळ्या भागांचा शोध घेतला जात आहे. जयश्री चौधरी यांचा शोध लागेपर्यंत बचावकार्य सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे बांभोरी पूल आणि परिसरात खळबळ उडाली असून, महिलेचा शोध लागण्याची प्रतीक्षा कुटुंबीय आणि नागरिकांकडून केली जात आहे.