Home ब्रेकिंग न्यूज POP Ganesh Idol Recycling : यंदा विसर्जित पीओपीच्या गणेश मूर्तींवर मुलुंडमध्ये होणार पुनर्प्रक्रिया

POP Ganesh Idol Recycling : यंदा विसर्जित पीओपीच्या गणेश मूर्तींवर मुलुंडमध्ये होणार पुनर्प्रक्रिया

0
POP Ganesh Idol Recycling : यंदा विसर्जित पीओपीच्या गणेश मूर्तींवर मुलुंडमध्ये होणार पुनर्प्रक्रिया

येत्या २५ सप्टेंबर होणार संस्थेची निवड, विविध संस्थांकडून मागवले स्वारस्य अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवामध्ये विसर्जित होणाऱ्या पीओपींच्या मूर्तींवर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेच्यावतीने मुलुंड येथे जागा निश्चित करण्यात आली आहे. याठिकाणी विसर्जित पीओपीच्या गणेश मूर्ती संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी येत्या २५ सप्टेंबर पर्यंत संस्थेची निवड करण्यात येणार असून प्रत्येक संस्थेकडून अभिरुची स्वारस्य अर्ज मागवण्यात आले आहे. त्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून या मूर्तींवर कशाप्रकारे प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाईल याचा विचार प्रामुख्याने केला जाणार आहे.

https://www.prahaar.in/2026/09/17/a-complete-break-in-rainfall-across-the-state-which-districts-will-get-relief-on-september-17-find-out-what-warning-the-meteorological-department-has-issued/

मुंबईत गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन मंगळवारी पार पडले तर अडीच दिवसांच्या मूर्तींचे विसर्जन बुधवार पार पडले. मंगळवारी दीड दिवसांच्या एकूण ६१ हजार६४० बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक आणि ३८५ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी पार पडले. यातील काही मूर्ती या पर्यावरणपुरक शाडू मातीच्या आहेत, तर काही मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या पीओपीच्या आहेत. मागील वर्षी विविध विसर्जन ठिकाणी विसर्जित झालेल्या पीओपीच्या मूर्ती डायघर येथे जमा करून ठेवण्यात आल्या होत्या. यावरून काहींनी वादही निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु यावेळी महापालिका प्रशासनाने याची काळजी घेत मुलुंडमध्ये एक जागा निश्चित करून ठेवली आहे. त्याठिकाणी दीड दिवसाच्या विसर्जित गणेश मूर्तीपासून पुढे अनंत चतुदर्शीपर्यंत विसर्जित होणाऱ्या सर्व पीओपीच्या गणेश मूर्ती जमा करून ठेवल्या जाणार आहे. महापालिकेच्या २६ विभागीय कार्यालयांच्या हद्दीतील विसर्जन स्थळांवरील पीओपीच्या मूर्ती मुलुंडमध्ये जमा करून तिथेच त्यावर प्रक्रिया करण्यासाठी संस्थेची निवड करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार उपायुक्त(घनकचरा व्यवस्थापन) यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जित सर्व मूर्तींवर प्रक्रिया करण्यासाठी संस्थेची नेमणूक करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी मुलुंडमध्ये जागा निश्चित करण्यात आली असून या जागेवर मागील वर्षींच्या २८०० टन पीओपी गणेश मूर्ती आणि आता या उत्सवात विसर्जित होणाऱ्या पीओपीच्या गणेश मूर्तींवर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापराच्या दृष्टीकोनातून नवीन तंत्रज्ञानाचा आधारे काय काय करता येवू शकते यासाठी विविध संस्थांकडून अभिरुची स्वारस्य अर्ज मागण्यात येत आहे. येत्या २५ सप्टेंबर पर्यंत यातील एका संस्थेची निवड केली जाईल आणि त्यानुसार विसर्जित पीओपीच्या मूर्तींवर पुनर्प्रक्रीया केली जाईल,असे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here