मुंबई : आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या रोख पारितोषिकाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. नव्या सुधारित योजनेनुसार ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या खेळाडूला पाच कोटी रुपये, रौप्यपदकासाठी तीन कोटी आणि कांस्यपदकासाठी दोन कोटी रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. राज्य सरकारने गुरुवारी रोजी यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी केला.(Maharashtra sports policy)
क्रीडा क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि बदलत्या परिस्थितीचा विचार करून विद्यमान रोख पारितोषिक योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा उद्देश आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देणे, राज्यातील क्रीडागुणांना चालना देणे आणि खेळाडूंच्या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रशिक्षकांचा सन्मान करणे हा आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध प्रशासकीय यंत्रणा उभारण्याबरोबरच ऑनलाइन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.
सुधारित योजनेनुसार आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकासाठी प्रत्येकी एक कोटी, रौप्यपदकासाठी ७५ लाख आणि कांस्यपदकासाठी ५० लाख रुपये देण्यात येतील. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकासाठी अनुक्रमे सात, पाच आणि तीन लाख रुपये, तर खेलो इंडिया स्पर्धांतील पदक विजेत्यांना अनुक्रमे तीन, दोन आणि एक लाख रुपये मिळतील.
जागतिक अजिंक्यपद किंवा विश्वचषक स्पर्धेच्या कालावधीनुसारही पारितोषिकाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या स्पर्धेतील सुवर्णपदकासाठी एक कोटी, रौप्यासाठी ७५ लाख आणि कांस्यपदकासाठी ५० लाख रुपये मिळतील. दोन वर्षांतून एकदा होणाऱ्या स्पर्धेसाठी ही रक्कम अनुक्रमे ५०, ३० आणि २० लाख रुपये, तर वार्षिक स्पर्धेसाठी २५, २० आणि १५ लाख रुपये असेल. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी सुवर्णपदकाला ५० लाख, रौप्याला ३० लाख आणि कांस्याला २० लाख रुपये देण्यात येतील.
https://www.prahaar.in/2026/09/17/major-fluctuation-in-gold-and-silver-prices-during-ganeshotsav-a-drop-of-this-much-in-a-single-day/
पॅरा खेळाडूंनाही मोठे पारितोषिक
- पॅरा ऑलिम्पिकमधील पदक विजेत्यांसाठीही ऑलिम्पिकप्रमाणेच पाच कोटी, तीन कोटी आणि दोन कोटी रुपयांचे पारितोषिक निश्चित करण्यात आले आहे. पॅरा एशियन गेम्समधील सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकासाठी अनुक्रमे एक कोटी, ७५ लाख आणि ५० लाख रुपये मिळतील. डेफ ऑलिम्पिक, आयबीएसए जागतिक अजिंक्यपद किंवा विश्वचषक, अंध क्रिकेट विश्वचषक तसेच विशेष ऑलिम्पिक आणि जागतिक क्रीडा स्पर्धांसाठीही स्वतंत्र पारितोषिकाची तरतूद करण्यात आली आहे.(Maharashtra sports policy)
- युवा आणि कनिष्ठ गटातील खेळाडूंनाही या योजनेत स्थान देण्यात आले आहे. युवा ऑलिम्पिक आणि युवा पॅरा ऑलिम्पिकमधील पदकासाठी सुवर्णाला ५० लाख, रौप्याला ३० लाख आणि कांस्याला २० लाख रुपये देण्यात येतील. युवा राष्ट्रकुल किंवा युवा आशियाई स्पर्धांसाठी ही रक्कम अनुक्रमे २०, १५ आणि १० लाख रुपये असेल. कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद आणि कनिष्ठ विश्वचषक स्पर्धांसाठी सुवर्णपदकाला १० लाख, रौप्याला सात लाख आणि कांस्यपदकाला पाच लाख रुपये मिळतील.
प्रशिक्षकांनाही बक्षीस
खेळाडूला मिळणाऱ्या रोख पारितोषिकाच्या एकूण रकमेपैकी दहा टक्के रक्कम संबंधित प्रशिक्षकांना देण्यात येणार आहे. ही रक्कम पायाभूत, विकासात्मक आणि उच्चस्तरीय प्रशिक्षण अशा तीन टप्प्यांत ३०:३०:४० या प्रमाणात विभागली जाईल. खेळाडूने स्पर्धेपूर्वी अधिकृत प्रशिक्षकाची नोंद करणे आवश्यक असून, जास्तीत जास्त तीन प्रशिक्षकांची नावे नोंदवता येतील.
https://www.prahaar.in/2026/09/17/lalbaugcha-rajas-prasad-now-served-on-eco-friendly-plates-ditching-plastic-has-prevented-1580-kg-of-carbon-emissions/
संघातील खेळाडूंसाठी स्वतंत्र सूत्र
- सांघिक खेळांसाठी वैयक्तिक खेळापेक्षा अधिक एकूण पारितोषिकाची तरतूद करण्यात आली आहे. दोन खेळाडूंच्या संघासाठी वैयक्तिक पारितोषिकाच्या दीडपट, तीन ते चार खेळाडूंच्या संघासाठी दुप्पट, पाच ते दहा खेळाडूंच्या संघासाठी तिप्पट आणि दहापेक्षा अधिक खेळाडू असलेल्या संघासाठी पाचपट रक्कम निश्चित करण्यात आली आहे. ही रक्कम संबंधित खेळाडूंमध्ये समान वाटली जाईल. राखीव खेळाडूंचाही गणनेत समावेश केला जाणार आहे.
- आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी देशांची संख्या कमी असल्यास पूर्ण पारितोषिकाऐवजी ठरावीक प्रमाणात रक्कम देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. चार वर्षांतून एकदा होणाऱ्या स्पर्धांसाठी पूर्ण रक्कम, दोन वर्षांतून एकदा होणाऱ्या स्पर्धांसाठी ५० टक्के आणि वार्षिक स्पर्धांसाठी २५ टक्के रक्कम देण्यात येईल. चारपेक्षा कमी देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धेसाठी रोख पारितोषिक देय राहणार नाही.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी खेळाडू महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणेही बंधनकारक आहे. मात्र, केंद्र सरकार, भारतीय रेल्वे, संरक्षण दल किंवा सार्वजनिक उपक्रमात कार्यरत असलेला महाराष्ट्राचा अधिवासी खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून प्रावीण्य मिळवल्यास तो या योजनेसाठी पात्र राहणार आहे. पदक मिळाल्यानंतर संबंधित क्रीडा संघटनेने १५ दिवसांच्या आत प्रमाणपत्रासह माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे सादर करणे अपेक्षित आहे.
https://www.prahaar.in/2026/09/17/deadline-extended-for-mhada-pune-lottery-2026-4462-homes-new-draw-date-announced/
कोणत्या स्पर्धांसाठी योजना लागू?
- बॅडमिंटनमधील थॉमस, उबेर आणि सुदीरमन कपच्या विजेत्याला ४० लाख, उपविजेत्याला २० लाख रुपये, तर टेनिसमधील चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या विजेत्याला तीन कोटी आणि उपविजेत्याला दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. हॉकीतील अझलन शाह कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेत्याला ४० लाख, उपविजेत्याला २० लाख, तर सुलतान जोहर कपच्या विजेत्या कनिष्ठ संघातील खेळाडूंना २० लाख आणि उपविजेत्यांना १० लाख रुपयांची तरतूद आहे.
- ही सुधारित योजना शासन निर्णयाच्या तारखेनंतर होणाऱ्या स्पर्धांना लागू राहणार आहे. योजनेतील पात्र स्पर्धांमध्ये भविष्यात समावेश, बदल किंवा वगळण्याचे अधिकार मंत्रिमंडळाकडे राहणार आहेत. पदक विजेत्यांना पारितोषिक मंजूर करण्यापूर्वी त्यांच्या कामगिरीची पडताळणी केली जाणार आहे.(Maharashtra sports policy)