Nashik Shalarth Scam : नाशिकमधील तब्बल १६० कोटी रुपयांच्या शालार्थ घोटाळ्याप्रकरणी राज्य शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि मुख्य संशयित नितीन मुरलीधर उपासनी यांच्या अडचणी कायम आहेत. नाशिकरोड सत्र न्यायालयाने उपासनी यांचा जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांचा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम कायम राहणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील दुसरे संशयित आणि माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांच्या जामीन अर्जावर २८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
बनावट नियुक्ती आदेशांचा आरोप
तपासात या घोटाळ्यात शिक्षण विभागातील एकाच जावक (आऊटवर्ड) क्रमांकाचा गैरवापर करून वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने बनावट नियुक्ती आदेश जारी केल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान तब्बल १२४ प्रकरणांमध्ये अधिकृत प्रशासकीय नोंदी आणि प्रत्यक्ष सिस्टीममधील डेटामध्ये मोठी तफावत आढळून आली. शासकीय कागदपत्रांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने फेरफार करून सरकारची सुमारे १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप या प्रकरणात आहे.
https://www.prahaar.in/2026/09/16/nashik-crime-news-while-he-was-arguing-with-his-wife-his-mother-intervened-and-the-son-ended-up-taking-his-mothers-life/
उपासनी यांचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने या प्रकरणाच्या स्वरूपाबाबत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, हा प्रकार संघटित स्वरूपाचा आणि सरकारी निधीशी संबंधित पांढरपेशा गुन्हा असल्याचे दिसून येते. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमुळे सार्वजनिक प्रशासनाच्या अखंडतेवर आणि विश्वासार्हतेवर परिणाम होऊ शकतो, असे नमूद करत न्यायालयाने उपासनी यांना जामीन देण्यास नकार दिला.
घोटाळ्याचे मुख्य केंद्र जळगाव
या प्रकरणी मार्च २०२६ मध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्तांच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासात नाशिक विभागातील तब्बल ८४१ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या ८४१ बनावट आयडींपैकी ६३८ आयडी एकट्या जळगाव जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे.
https://www.prahaar.in/2026/09/16/nashik-crime-news-rampage-over-unpaid-ganpati-contribution-vandalism-with-choppers-and-knives-stone-pelting-and-looting/
आतापर्यंत आठ जणांना अटक
या प्रकरणात आतापर्यंत नितीन उपासनी, किरण पाटील, राहुल पवार, संस्थाचालक प्रशांत वाडीले, माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, संजय गरूड, दीपक गरूड आणि लॅब असिस्टंट तुषार साळुंके यांना अटक करण्यात आली आहे. उपासनी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी २० ऑगस्ट रोजी पूर्ण झाली होती. मात्र न्यायालयातील इतर कामकाजामुळे निकाल प्रलंबित होता. अखेर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने उपासनी यांना दिलासा मिळालेला नाही. आता हिंगोणेकर यांच्या जामीन अर्जावरील २८ सप्टेंबरच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.