पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 80 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. शनिवारी दुपारी 1 वाजता पुण्यातील नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Ratnakar Mahajan)
रत्नाकर महाजन हे काँग्रेसमधील अभ्यासू, संयमी आणि निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जात होते. ते राज्य नियोजन महामंडळाचे माजी अध्यक्ष होते. तसेच लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. समाजवादी विचारवंत आणि राजकीय विश्लेषक म्हणूनही त्यांची वेगळी ओळख होती. ( Congress Leader)
रत्नाकर महाजन हे व्यवसायाने डॉक्टर होते. मात्र समाजवादी विचारसरणीने प्रभावित होऊन त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. आणीबाणीच्या काळात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे आणि ग. प्र. प्रधान यांसारख्या समाजवादी विचारवंतांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. ( Maharashtra Politics)
https://www.prahaar.in/2026/09/12/kem-hospital-safer-against-fire/
समाजवादासोबतच आगरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांनाही त्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्यातून पुढे नेण्याचा प्रयत्न केला. सामाजिक क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर ते काँग्रेसचे प्रवक्ते झाले.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात काँग्रेसची राजकीय पिछेहाट होत असताना पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी रत्नाकर महाजन यांनी सांभाळली. विरोधकांवर टीका करताना आक्रमक भाषा किंवा अपशब्दांचा वापर न करता अभ्यासपूर्ण पद्धतीने आपली भूमिका मांडण्याची त्यांची शैली विशेष चर्चेत होती. (Maharashtra Politics)
राजकारणातील चर्चेचा स्तर खालावत असताना संयमी संवाद, अभ्यासपूर्ण मांडणी आणि राजकीय नैतिकता यासाठी रत्नाकर महाजन यांची आठवण कायम राहील. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसने एक अभ्यासू आणि अनुभवी नेता गमावला आहे.