Home महाराष्ट्र नाशिक Nashik : पशुवैद्यकीय दवाखान्याच्या जागेचा पेच मिटला, ५० हजारांहून अधिक पशुधनाची जबाबदारी

Nashik : पशुवैद्यकीय दवाखान्याच्या जागेचा पेच मिटला, ५० हजारांहून अधिक पशुधनाची जबाबदारी

0
Nashik : पशुवैद्यकीय दवाखान्याच्या जागेचा पेच मिटला, ५० हजारांहून अधिक पशुधनाची जबाबदारी

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांच्या सोयीसाठी दर्शनपथ उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या विविध शासकीय वास्तू हटविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये तहसील कार्यालय, उपजिल्हा रुग्णालयासह पशुवैद्यकीय दवाखान्याचाही समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालय पाडण्यास स्थानिकांकडून विरोध झाल्याने त्याच्या पाडकामाला सध्या स्थगिती देण्यात आली आहे.

मात्र, पशुवैद्यकीय दवाखान्याच्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर कुंभमेळा प्राधिकरणाच्या पुढाकाराने दवाखान्यासाठी त्र्यंबकेश्वर शहरातच तात्पुरती जागा उपलब्ध झाली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी शहराच्या आतील भागात वाढू नये, तसेच भाविकांनी दर्शन घेऊन पुढे जावे, यासाठी दर्शनपथ तयार करण्यात येत आहे. या कामात तहसील कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारती अडथळा ठरत आहेत.

तहसील कार्यालयाचेही होणार स्थलांतर

तहसील कार्यालय पुढील आठवड्यात पाडण्यात येणार असल्याने तेथील कामकाज त्र्यंबकेश्वरमधील बचत गट भवनात स्थलांतरित केले जात आहे. दुसरीकडे, उपजिल्हा रुग्णालय पाडण्यास स्थानिकांनी विरोध केल्याने सध्या त्याच्या पाडकामाला स्थगिती आहे. रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असून, इतर कामकाज तुपेवाडी येथील रुग्णालय परिसरातून सुरू आहे.पशुवैद्यकीय दवाखान्याचा प्रश्न मात्र वेगळाच होता. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सहाहून अधिक गावांमधील ५० हजारांहून अधिक पशुधनाच्या उपचाराची जबाबदारी या दवाखान्यावर आहे. त्यामुळे दवाखाना स्थलांतरित झाल्यास पशुपालकांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. दवाखाना पाडण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पशुवैद्यकीय विभागाने त्र्यंबकेश्वर शहरात पर्यायी जागेसाठी प्रयत्न केले. मात्र, स्थानिक पातळीवर जागा उपलब्ध न झाल्याने सुरुवातीला दवाखाना त्र्यंबकेश्वरपासून सुमारे ७ किलोमीटर अंतरावरील अंजनेरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात हलविण्याची तयारी करण्यात आली होती.

https://www.prahaar.in/2026/09/11/simhastha-kumbh-mela-no-entry-for-private-vehicles-during-the-auspicious-amrut-parvani-at-the-simhastha-kumbh-mela/

कुंभ प्राधिकरणाचा पुढाकार

याविषयी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मेहेरे यांनी, नगरपालिकेशी जागेविषयी पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु, त्यांनी शहरात जागा नसल्याचे सांगितल्याची माहिती दिली. आमची इमारतही पाडण्याचा प्रयत्न झाला. तहसील कार्यालय स्थलांतराला सुरूवात झाल्याने आम्ही आता अंजनेरी येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात स्थलांतरीत होत असल्याचा पत्रव्यवहार कुंभमेळा प्राधिकरणाशी करत असतांना आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात जागा मिळाल्याचे डाॅ. मेहेरे यांनी सांगितले. जुन्या तहसील कार्यालयाजवळील एका जुन्या कक्षात दवाखाना तात्पुरता स्थलांतरीत होत आहे. सध्या त्या कक्षाची दुरूस्ती करण्यात येत असल्याचे डॉ. मेहेरे यांनी नमूद केले.

त्र्यंबकेश्वर येथील पशु वैद्यकीय दवाखान्या संदर्भात संबंधित विभागाकडून कायमस्वरूपी जागा मिळावी, यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जागेचा शोध सुरू आहे. सध्या दवाखान्यासाठी जुन्या तहसील कार्यालयाजवळ असलेल्या कक्षात व्यवस्था करण्यात आली आहे. कायमस्वरूपी जागेचा शोध सुरू आहे.- शेखर सिंह (आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here