नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) देशाच्या अंतराळ क्षेत्रातील प्रगतीत आणखी एक सुवर्णपान जोडले आहे. इस्रोने आपल्या ‘CE20’ या अत्यंत शक्तिशाली क्रायोजेनिक इंजिनची २२० किलोन्यूटन (kN) या उच्च क्षमतेवर यशस्वी चाचणी (Flight Acceptance Hot Test) पूर्ण केली आहे. या यशांमुळे भारताच्या ‘LVM3’ या सर्वात बलाढ्य रॉकेटची उपग्रह वाहून नेण्याची क्षमता तर वाढेलच, शिवाय भारताच्या बहुप्रतिक्षित ‘गगनयान’ या मानवी अंतराळ मोहिमेलाही मोठा वैज्ञानिक पाठबळ मिळणार आहे.
तामिळनाडूमधील महेंद्रगिरी येथे पार पडली चाचणी
‘गगनयान’ मोहिमेसाठी आवश्यक उपकरणाचे यशस्वी प्रात्यक्षिक
या चाचणीदरम्यान केवळ इंजिनचीच क्षमता तपासली गेली नाही, तर गगनयान मोहिमेतील ‘C32 टप्प्यासाठी’ अत्यंत आवश्यक मानल्या जाणाऱ्या ‘लोक्स टँक प्रेशरायझेशन मॉड्यूल’ (LTPM) ची कामगिरीही अभ्यासण्यात आली. चाचणीदरम्यान या सिस्टीमने अत्यंत अचूक आणि उत्तम कामगिरी बजावली.
https://www.prahaar.in/2026/09/10/manoj-jaranges-hunger-strike-will-be-called-off-before-12th-september-minister-uday-samant-government-making-all-out-efforts-to-find-a-solution/
LVM3 रॉकेटची ताकद कशी वाढणार ?
‘CE20’ हे इंजिन LVM3 रॉकेटच्या सर्वात वरच्या (अपर) क्रायोजेनिक टप्प्याला उड्डाणासाठी आवश्यक असलेली प्रचंड ऊर्जा पुरवते. भविष्यात अंतराळात अधिक वजनदार आणि अत्याधुनिक उपग्रह यशस्वीपणे पाठवण्यासाठी इस्रो या रॉकेटमध्ये २२-टन क्षमतेच्या CE20 इंजिनसह अपग्रेटेड ‘C32 स्टेज’ वापरण्यावर भर देत आहे.
मार्च महिन्यात पार पडली होती प्राथमिक चाचणी
यापूर्वी चालू वर्षाच्या मार्च महिन्यात महेंद्रगिरी येथील केंद्रावरच या इंजिनची समुद्रसपाटीवर २२-टन क्षमतेची १६५ सेकंदांची चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी इंजिनच्या संरक्षणासाठी ‘नोझल प्रोटेक्शन सिस्टीम’चा वापर करण्यात आला होता. मार्चमधील चाचणीचा मुख्य उद्देश इंजिनला उच्च क्षमतेवर काम करण्यासाठी पात्र ठरवणे हा होता. त्यावेळी इंजिनने सलग १६५ सेकंद उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली होती, ज्याचा पुढील टप्पा म्हणून ही नवीन चाचणी घेण्यात आली.
क्रायोजेनिक इंजिनची चाचणी आव्हानात्मक का असते ?
CE20 इंजिनच्या विशेष बनावटीमुळे आणि रचनेमुळे जमिनीवर किंवा समुद्रसपाटीवर याची चाचणी घेणे अत्यंत कठीण मानले जाते. उड्डाण आणि चाचणी दरम्यान इंजिनमध्ये प्रचंड उष्णता आणि कंपन (Vibrations) निर्माण होतात, ज्यामुळे इंजिनचे नुकसान होण्याचा धोका असतो. मात्र, भारतीय शास्त्रज्ञांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर या सर्व तांत्रिक आव्हानांवर मात करत ही चाचणी यशस्वी केली.
‘EOS-05’ उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणापाठोपाठ मिळालेले नवे यश
विशेष म्हणजे, ५ सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ‘GSLV-F17’ रॉकेटच्या साहाय्याने ‘EOS-05’ (अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाइट) या अत्याधुनिक उपग्रहाचे यशस्वी उड्डाण करण्यात आले होते. या ऐतिहासिक यशानंतर अवघ्या काही दिवसांतच इस्रोने ही दुसरी मोठी कामगिरी करून दाखवली आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितले की, २,३६७ किलोग्रॅम वजनाचा EOS-05 उपग्रह त्याच्या निर्धारित कक्षेत यशस्वीपणे प्रस्थापित झाला आहे. हा उपग्रह पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर जिओसिंक्रोनस कक्षेतून भारताच्या सीमांवर आणि भूप्रदेशावर थेट नजर ठेवणारा देशाचा पहिला समर्पित ‘इमेजिंग सॅटेलाइट’ ठरेल.