Nashik : गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ दिसून येत आहे. अशातच आता मोबाईल टॉवर बसवून हजारो रुपयांचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या जागेवर मोबाईल टॉवर बसवून दरमहा २५ ते ५० हजार रुपये भाडे मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या बनावट संकेतस्थळे, फोन कॉल, संदेश आणि जाहिरातींपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
नेमकं प्रकरण काय ?
बीएसएनएलच्या नावाने बनावट संकेतस्थळे तयार करण्यात आली असून, त्यावर रूफटॉप टॉवर बसविण्याच्या मोबदल्यात दरमहा २५ ते ५० हजार रुपये देण्याचे आमिष नागरिकांना दाखवले जात आहे. या माध्यमातून नागरिकांकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा अन्य संवेदनशील माहिती मिळविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे अनोळखी व्यक्तींना फोनवरून किंवा ऑनलाइन माध्यमातून वैयक्तिक अथवा आर्थिक माहिती देऊ नये.
https://www.prahaar.in/2026/09/09/nashik-nashiks-roads-to-be-pothole-free-before-ganeshotsav-commissioner-issues-strict-orders-to-departments/
मोबाईल टॉवरच्या नावाने खोटी ऑफर
बीएसएनएलनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना बनावट संकेतस्थळे आणि मोबाईल टॉवरच्या ऑफरबाबत सावध केले आहे. टॉवर बसविण्याच्या नावाखाली नोंदणी शुल्क, प्रक्रिया शुल्क किंवा अन्य कोणत्याही कारणाने पैसे मागितल्यास नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. कोणतीही माहिती भरताना संबंधित संकेतस्थळाची अधिकृतता तपासणे आवश्यक आहे. मोबाईल टॉवरच्या नावाने मोठ्या उत्पन्नाचे आमिष दाखविणारी ऑफर फसवणुकीचे माध्यम ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि अशा प्रकारची संशयास्पद बाब आढळल्यास तातडीने पोलीस किंवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.