मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गणेशभक्तांच्या वाहनांना 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत टोलमाफी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचाही या टोलमाफीमध्ये समावेश करण्यात आला आहे. (Ganeshostav 2026)
गणेशोत्सवासाठी टोलमाफीचा निर्णय
गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे तसेच राज्यातील इतर भागांतून मोठ्या संख्येने नागरिक कोकणाकडे रवाना होतात. या काळात महामार्गांवर वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने प्रवाशांना आर्थिक दिलासा देण्यासाठी टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66, मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील संबंधित मार्गांवर ही सवलत लागू राहणार आहे. (Konkan Travel)
https://www.prahaar.in/2026/09/09/another-mishap-involving-a-ganesh-idol-in-mumbai-trolley-carrying-prem-nagarcha-maharaja-overturns-in-kurla/
टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी वाहनांवर ‘गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन’ असा विशेष पास किंवा स्टिकर लावणे आवश्यक आहे. या पासवर वाहन क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाणार आहे. पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयांमार्फत हा पास उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (Ganeshotsav Toll Waiver)
महत्त्वाचे म्हणजे कोकणात जाताना घेतलेला पास परतीच्या प्रवासासाठीही वैध असणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर मुंबई (Mumbai News) किंवा इतर शहरांकडे परतताना स्वतंत्र पास घेण्याची गरज भासणार नाही. (Ganesh Chaturthi)
खासगी वाहनांबरोबरच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसनाही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांनाही या निर्णयाचा फायदा होणार आहे.
यंदा 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. त्यापूर्वीच 11 सप्टेंबरपासून टोलमाफी सुरू होणार असल्याने गणेशोत्सवासाठी लवकर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे. टोलनाक्यांवर गर्दी होऊ नये आणि प्रवास सुरळीत व्हावा, यासाठी प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गणेशभक्तांना प्रवास खर्चात काही प्रमाणात बचत होऊन मोठा दिलासा मिळणार आहे. (Chakarmani)