Dharmavir Fort : छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची आणि बलिदानाची साक्ष देणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक धर्मवीर गडाला मोठा सन्मान मिळाला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील या ऐतिहासिक गडाला आता राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने ७ सप्टेंबर रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला. त्यामुळे धर्मवीर गडाच्या जतन, संवर्धन आणि सुशोभीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
https://www.prahaar.in/2026/09/08/kanpur-murder-case-millionaire-daughter-in-law-hatched-the-plot-to-murder-her-father-in-law-that-message-and-phone-calls-exposed-her/
ऐतिहासिक वारशाला सरकारची मोठी सलामी
अहिल्यानगर जिल्ह्यातील पेडगाव येथील हा यादवकालीन किल्ला ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. मराठा साम्राज्याच्या इतिहासात या गडाला विशेष स्थान आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश मुघलांच्या तावडीत सापडल्यानंतर त्यांना याच बहादूरगडावर आणण्यात आले होते. त्या काळात औरंगजेबाचा हा महत्त्वाचा लष्करी तळ होता. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यावर तब्बल ४० दिवस मुघली छळसत्र याच गडावर चालले. मुघली क्रौर्याला मराठी स्वाभिमान, धैर्य आणि बलिदानाने दिलेल्या उत्तराची साक्ष म्हणून या गडाकडे पाहिले जाते. त्यामुळेच पुढे या गडाला ‘ धर्मवीर गड ’ अशी ओळख प्राप्त झाली. मात्र, हे ठिकाण राज्य संरक्षित स्मारक नसल्याने गडावरील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक; तसेच स्थापत्यशास्त्राचे उत्तम नमुने असलेली रामेश्वर, भैरवनाथ, लक्ष्मीनारायण, बाळेश्वर आणि पाताळेश्वर ही मंदिरे यांच्या संवर्धनात अडचणी येत होत्या. त्यामुळे धर्मवीर गड संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी होत होती.
https://www.prahaar.in/2026/09/08/ahilyanagar-onion-sparks-trouble-sister-attacked-for-bringing-onions-from-the-field-case-registered-against-six-people/
आमदार विक्रम पाचपुते यांच्या पाठपुराव्याला यश
पेडगावचा हा ऐतिहासिक गड पूर्वी बहादूरगड म्हणून ओळखला जात होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाशी जोडलेला हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी त्याला ‘धर्मवीर गड’ असं नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी या गडाच्या नामकरणासोबतच त्याच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. पाचपुते यांच्या मागणीनंतर पेडगाव येथील बहादूरगडाचं अधिकृत नामकरण धर्मवीर गड करण्यात आलं. आणि आता याच गडाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्याने ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचं पाऊल पडले आहे.
या निर्णयामुळे गडाचं ऐतिहासिक महत्त्व जपण्यासोबतच भविष्यात त्याच्या संवर्धन, विकास आणि सुशोभीकरणासाठी शासकीय पातळीवर उपाययोजना करण्याचा मार्गही खुला झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची आठवण जपणाऱ्या या ऐतिहासिक स्थळाला मिळालेला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा हा अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आणि इतिहासप्रेमींसाठी निश्चितच महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.