मुंबई : मुंबईत ९ ते २३ सप्टेंबर या कालावधीत कडक प्रतिबंधात्मक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शांतता भंग, सार्वजनिक सुव्यवस्थेत अडथळा आणि जीवित अथवा मालमत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता विचारात घेऊन मुंबई पोलिसांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबईचे पोलीस उपआयुक्त (ऑपरेशन्स) आणि बृहन्मुंबईचे कार्यकारी दंडाधिकारी अकबर पठाण यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ च्या कलम ३७(३) सह कलम १० (२) अन्वये हे आदेश जारी केले आहेत. (Mumbai Police)
https://www.prahaar.in/2026/09/05/no-towering-human-pyramids-nor-the-usual-method-dahi-handi-is-celebrated-in-kurdus-by-diving-into-a-well-watch-the-video/
या १५ दिवसांच्या कालावधीत ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर आणि मिरवणुका काढण्यावर बंदी असेल. तसेच मिरवणुकीदरम्यान लाऊडस्पीकर, ॲम्प्लीफायर, संगीत बँड आणि फटाक्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. (Mumbai News)
मात्र, नागरिकांचे दैनंदिन जीवन, धार्मिक आणि व्यावसायिक व्यवहार सुरळीत चालावेत यासाठी काही महत्त्वाच्या सवलती देण्यात आल्या आहेत. लग्नसोहळे, अंत्ययात्रा, शाळा-महाविद्यालयांचे शैक्षणिक उपक्रम, कारखाने व दुकानांचे कामकाज यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. याशिवाय चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सरकारी कार्यालये आणि सहकारी संस्थांच्या अधिकृत सभांवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत.
पोलीस प्रशासनाने या आदेशाला व्यापक प्रसिद्धी देण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी आणि न्यायालयात याचे फलक लावले जातील. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल आणि आदेशाची मुदत संपल्यानंतरही दंडात्मक कारवाई लागू राहील. ( Restrictions In Mumbai)