रायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कुर्डुस गावात दरवर्षी दहीहंडीचा एक अत्यंत अनोखा आणि थरारक सोहळा पाहायला मिळतो. एरवी दहीहंडी म्हटलं की थरावर थर रचून मानवी मनोरे उभे केले जातात. मात्र कुर्डुसमध्ये दहीहंडी साजरी करण्याची पद्धत अगदी वेगळी आहे. येथे गोविंदा थेट विहिरीत उडी मारून दहीहंडी फोडतात. ही आगळीवेगळी परंपरा पाहण्यासाठी दरवर्षी स्थानिक नागरिकांसह मुंबई, पुणे आणि रायगड परिसरातून हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
https://www.prahaar.in/2026/09/05/ban-on-muslims-entering-navratri-garba-events/
कुर्डुस गावाच्या मध्यभागी असलेल्या देऊळ आळी परिसरात एक मोठी विहीर आहे. ही विहीर सुमारे 40 फूट खोल असून तिच्यावर साधारण 25 फूट उंचीवर दहीहंडी बांधली जाते. हंडी फोडण्यासाठी गोविंदांना विहिरीच्या कठड्यावरून हवेत उंच झेप घ्यावी लागते. हवेत उडी मारून हंडीला स्पर्श करायचा आणि थेट विहिरीच्या पाण्यात उडी मारायची, अशी ही थरारक पद्धत आहे. गोविंदाचा हात हंडीला लागताच ती फुटली असे मानले जाते.
View this post on Instagram
या अनोख्या परंपरेची सुरुवात 1992 मध्ये झाली. गावातील काही तरुण एकत्र आले आणि त्यांनी काहीतरी वेगळे करण्याचा विचार केला. त्यातूनच विहिरीवर दहीहंडी साजरी करण्याची ही कल्पना पुढे आली. सुरुवातीला झाडांच्या फांद्यांचा आधार घेऊन हंडी फोडण्याचा प्रयत्न केला जायचा. मात्र हळूहळू विहिरीच्या कठड्यावरून उडी मारून हंडी फोडण्याची ही रोमांचक पद्धत रूढ झाली.
आज ही परंपरा संपूर्ण परिसरात ‘एक गाव, एक दहीहंडी’ म्हणून प्रसिद्ध झाली आहे. गेल्या तीन दशकांपासून कुर्डुसच्या गावकऱ्यांनी ही संस्कृती अतिशय उत्साहाने आणि गुण्यागोविंदाने जपून ठेवली आहे. विहिरीवर लटकवलेली हंडी, गोविंदांची धाडसी झेप आणि पाण्यात पडणारा थरार यामुळे ही दहीहंडी महाराष्ट्रातील इतर सर्व उत्सवांपेक्षा वेगळी ठरते.