नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये (Operation Sindoor) मिळालेल्या प्रचंड यशानंतर भारताने रशियाकडून आणखी पाच ‘एस-४०० ट्रायम्फ’ (S-400 Triumf) हवाई संरक्षण यंत्रणा खरेदी करण्याच्या हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. यासंदर्भात रशियाने आपल्या खर्चाचा आणि आवश्यक साहित्याचा तपशीलवार प्रस्ताव (BOQ) भारत सरकारकडे पाठवला आहे. या प्रस्तावामुळे आता दोन्ही देशांमध्ये या कराराच्या अंतिम किमतीबाबत अधिकृत चर्चा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रशियाकडून आलेला हा प्रस्ताव आणि अंतिम किंमत निश्चित झाल्यानंतर, पाच नवीन एस-४०० स्क्वाड्रन खरेदीचा प्रस्ताव ‘केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समिती’कडे (CCS) मंजुरीसाठी पाठवला जाईल. अर्थ मंत्रालयाची परवानगी आणि किमतीची वाटाघाटी पूर्ण झाल्यावर यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. विशेष म्हणजे, २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ५.४३ अब्ज डॉलरचा करार करून पहिल्या पाच एस-४०० यंत्रणांची ऑर्डर दिली होती. त्यातील शेवटची आणि पाचवी एस-४०० प्रणाली या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतात दाखल होणार आहे. ही पाचवी प्रणाली चीनच्या सीमेला लागून असलेल्या भारताच्या पूर्व भागात तैनात केली जाणार आहे.
https://www.prahaar.in/2026/09/05/a-%e2%82%b951-lakh-prize-and-the-race-for-a-10-tier-pyramid-dhakumakum-celebrations-in-thane-this-year/
दुसरीकडे, भारत रशियाकडून ‘सुखोई-५७’ (Su-57) या पाचव्या पिढीतील दोन स्क्वाड्रन लढाऊ विमाने खरेदी करणार असल्याचे काही बातम्यांमध्ये म्हटले जात होते. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असा कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. असे असले तरी, चायनीज पीएलएने तिबेटमधील होतान, ल्हासा आणि न्यिंची येथील हवाई तळांवर ‘जे-२०’ (J-20) ही पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने तैनात केल्यामुळे, भारतीय हवाई दलाने रशियाच्या या प्रस्तावात रस दाखवला आहे.
मे २०२५ मध्ये पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान एस-४०० या रशियन क्षेपणास्त्र प्रणालीची कामगिरी अत्यंत उत्कृष्ट आणि चमकदार ठरली होती. या प्रणालीने आपल्या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या साहाय्याने पाकिस्तानच्या हद्दीत तब्बल ३१४ किलोमीटर अंतरावर असलेल्या हवाई इशारा प्रणालीच्या (AWACS) विमानाचा अचूक वेध घेतला होता. पाकने आदमपूर आणि भुज हवाई तळांवर तैनात एस-४०० वर ‘कामिकाझे’ ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु या रशियन यंत्रणेने पाकी लढाऊ विमानांना सीमेच्या आसपासही भटकू दिले नाही.
इतकेच नव्हे तर, १० मे रोजी भारताच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या ११ हवाई तळांवर जोरदार हल्ला चढवला होता, तर भारताच्या एस-४०० आणि आकाश तीर या हवाई संरक्षण प्रणालींनी पाकिस्तानची तब्बल सात लढाऊ विमाने पाडली होती. या दारुण पराभवानंतर घाबरलेल्या पाकिस्तानी हवाई दलाने आपली सर्व उर्वरित विमाने अफगाणिस्तान सीमेजवळील ड्युरांड लाईन भागातील तळांवर हलवली होती. येत्या ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या ब्रिक्स (BRICS) परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात येत आहेत. या दौऱ्यादरम्यान भारत आणि रशियामधील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत होण्याची शक्यता असून, विशेषतः हायपरसोनिक क्षेपणास्त्र क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये नवीन करार होऊ शकतात.