राज्यभरात आज दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून, यंदाच्या गोपाळकाळ्याचा मुख्य केंद्रबिंदू पुन्हा एकदा ठाणे शहर ठरत आहे. मुंबईतील आघाडीची गोविंदा पथके दहा थरांचा विक्रम रचण्याच्या इराद्याने ठाण्याच्या दिशेने रवाना झाली आहेत. गेल्या वर्षी ‘जय जवान’ आणि ‘कोकण नगर’ या पथकांनी १० थरांचे मानवी मनोरे रचून नवा इतिहास घडवला होता. यंदा त्यांच्यासोबतच ‘आर्यन्स’ हे पथकही या दहा थरांच्या शर्यतीत उतरल्यामुळे उपनगरांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.
गोविंदा पथकांनी सकाळपासूनच आपापल्या भागातील मानाच्या हंड्या फोडून उत्सवाला सुरुवात केली आहे. जय जवान गोविंदा पथकाचे महेश सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी येथे मानाचे पहिले थर लावल्यानंतर आणि संकटमोचन हनुमान मंदिरातील हंडी फोडल्यानंतर पथक पुढील प्रवासासाठी निघेल. या पथकासोबत तब्बल ६०० ते ७०० गोविंदा आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सुमारे २००० समर्थक असून, त्यांच्या वाहतुकीसाठी बस आणि ट्रकची विशेष सोय करण्यात आली आहे.
https://www.prahaar.in/2026/09/05/11-8-kg-of-hydroponic-cannabis-seized-at-mumbai-airport-woman-arriving-from-bangkok-arrested/
यंदा ठाण्यातील हिरानंदानी परिसरातील दहीहंडी आयोजकांनी तब्बल ५१ लाख रुपयांचे सर्वाधिक पारितोषिक ठेवल्यामुळे ती विशेष आकर्षण ठरत आहे. याशिवाय वर्तक नगर, संस्कृती प्रतिष्ठान आणि इतर प्रमुख मानाच्या हंड्यांवर गोविंदांची तुफान गर्दी होणार आहे. दुसरीकडे, महिला गोविंदा पथकेही या उत्साहात मागे नाहीत. जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथकाने ६ थरांची सलामी देत ठाण्यातील विविध हंड्यांवर कौशल्य दाखवण्याची तयारी पूर्ण केली आहे.
काही मंडळांनी सुरक्षेला प्राधान्य देत मर्यादित थरांचे नियोजन केले आहे. माझगाव ताडवाडी येथील श्री दत्त क्रीडा मंडळाने सुरक्षा नियमांचे पालन करत यंदा ७ थर लावण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे, ९ थरांचा विक्रम २१ पेक्षा जास्त वेळा रचणाऱ्या आर्यन्स पथकाने गेल्या वर्षी राहिलेली १० थरांची कसर यंदा भरून काढण्याचा ठाम निर्धार केला आहे. एकूणच, मुंबई आणि ठाण्यात आज दिवसभर गोविंदांचा उत्साह आणि डीजेचा कडकडाट पाहायला मिळणार आहे.