छत्रपती संभाजीनगर : शहरातील आकाशवाणी चौक परिसरातील एशियन हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच रुग्णालयात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, ज्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची माहिती आहे, त्याच मजल्यावर लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात (NICU) ९ बालकांवर उपचार सुरू होते.
आग लागल्यानंतर रुग्णालयात धुराचे लोट पसरले. परिस्थिती लक्षात येताच अग्निशमन दल, पोलीस, रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णवाहिका पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. प्राथमिक माहितीनुसार, पहिल्या मजल्यावर उपचार घेत असलेल्या ५८ रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. यामध्ये NICU मधील ९ बालके, जनरल वॉर्डमधील ३६ रुग्ण आणि स्पेशल रूममधील १३ रुग्णांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
https://www.prahaar.in/2026/09/04/major-traffic-changes-in-pune-for-dahi-handi-and-shri-krishna-jayanti-these-key-roads-to-remain-closed-on-september-4-and-5/
बचावण्यात आलेल्या ९ बालकांना पुढील उपचारांसाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, ५ बालकांना घाटी रुग्णालयात, ३ बालकांना एमजीएम रुग्णालयात, तर एका बालकाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवल्याने ती इतर वॉर्ड आणि मजल्यांपर्यंत पसरण्याचा धोका टळला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, एसीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अंतिम कारण अधिकृत तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
https://www.prahaar.in/2026/09/04/follow-these-simple-dietary-tips-to-avoid-weakness-while-fasting-on-janmashtami-keep-your-body-healthy-and-energetic/
दरम्यान, सर्व ९ बालकांची प्रकृती सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती असून, त्यांच्यावर संबंधित रुग्णालयांमध्ये वैद्यकीय पथकांकडून उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.