विरार : पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच संतापाच्या भरात एका महिलेने तिच्या सवतीवर चाकू आणि त्रिशूळने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. या हल्ल्यात २२ वर्षीय कोमल सरोज ही महिला गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच बोलिंज पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी पहिल्या पत्नीला अटक केली आहे. आरोपी लक्ष्मी प्रसाद (वय ३१) ही विरार येथील ‘मेफेअर गार्डन’ सोसायटीत तिच्या पतीसोबत राहत होती. तिच्या पतीने जुलै २०२४ मध्ये लक्ष्मीला कोणतीही माहिती न देता कोमल सरोज हिच्याशी गुपचूप दुसरे लग्न केले होते. पतीच्या या दुसऱ्या लग्नाबद्दल पहिली पत्नी लक्ष्मी पूर्णपणे अंधारात होती.
https://www.prahaar.in/2026/09/02/jalgaon-prostitution-racket-busted-in-jalgaon-with-the-help-of-a-decoy-customer/
रविवारी दुसरी पत्नी कोमल अचानक लक्ष्मी राहत असलेल्या घरी पोहोचली. सवत समोर दिसताच लक्ष्मीचा राग अनावर झाला आणि दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर लक्ष्मीने घराचा मुख्य दरवाजा आतून बंद केला आणि घरातील चाकू व त्रिशूळने कोमलवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. हल्ल्यातून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जखमी कोमलने प्रसंगावधान राखून स्वतःला एका बेडरूममध्ये कोंडून घेतले. तेथून तिने तातडीने पोलिसांच्या ‘११२’ या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच बोलिंज पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले, दरवाजा तोडून कोमलची सुटका केली आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. बोलिंज पोलिसांनी आरोपी लक्ष्मी प्रसाद हिला ताब्यात घेऊन तिच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०९ (हत्या करण्याचा प्रयत्न) आणि कलम ३५२ अन्वये गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोमलची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.