मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) ड्रग इन्स्पेक्टर (ग्रुप-B) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणखी एका उमेदवाराला अटक केली आहे. परीक्षेत सातवा क्रमांक मिळवलेल्या ऋतुजा पाटील हिला मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने नंदुरबार येथून अटक केली. या अटकेनंतर प्रकरणातील आरोपींची संख्या सात झाली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ऋतुजा पाटील हिला परीक्षेपूर्वीच फुटलेली प्रश्नपत्रिका मिळाली होती. परीक्षेत तिच्या कामगिरीवर संशय निर्माण होऊ नये, यासाठी तिला जाणीवपूर्वक 10 प्रश्नांची चुकीची उत्तरे देण्यास सांगण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. अटकेनंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले असून, मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे.
या प्रकरणात यापूर्वी तीन MPSC अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये MPSCचे सहाय्यक विभाग अधिकारी विश्वेश्वर दत्तात्रय नकाते आणि गोपाल भट्टू मराठे, अवर सचिव अभिजित गणपतराव लेंडवे, नंदुरबार येथील कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण दिलीप पाटील तसेच अमृत नामदेव पाटील आणि लोकेश उर्फ गौरव पाटील यांचा समावेश आहे. ( Drug Inspector Exam)
https://www.prahaar.in/2026/09/02/major-update-in-the-dr-sampada-munde-suicide-case-home-department-constitutes-a-high-level-committee/
पोलिसांच्या आरोपानुसार, आरोपींनी परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका मिळवली. त्यानंतर तिचा स्वतंत्र संच तयार करून तो काही व्यक्तींना वितरित करण्यात आला.
दरम्यान, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक (गट-B) पदासाठी 22 मार्च 2026 रोजी चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेतील गोपनीयतेचा भंग झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्यानंतर MPSCने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या परीक्षेचा निकाल 12 जून रोजी जाहीर झाला होता. एकूण 506 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी 488 उमेदवार मुलाखतीला उपस्थित राहिले. त्यानंतर 488 उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. (MPSC Exam)
मात्र, परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवार आणि लोकप्रतिनिधींकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रकरणाची चौकशी सुरू झाली. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंधक कायदा आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.