मुख्य सचिवांकडे चौकशीची केली आमदार मिहिर कोटेचा यांनी मागणी; आपल्याकडेही ‘रेट कार्ड’ असल्याचा केला दावा
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये पुन्हा एकदा आर्थिक व्यवहारांचा आरोप समोर आला आहे. अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये कथित ‘कॅश फॉर ट्रान्सफर’ प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडे केली आहे. तसेच, आपण मागितलेली माहिती देण्यास विलंब होत असल्याने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे यांच्या भूमिकेचीही चौकशी करावी, अशी मागणी कोटेचा यांनी केली आहे.
महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. २०२५ मध्ये तत्कालीन महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी महापालिकेतील १६५ अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. त्यानंतर भाजपचे आमदार अमित साटम यांनी या बदल्यांमध्ये ‘कॅश फॉर ट्रान्सफर’चा प्रकार झाल्याचा आरोप करत लेखी तक्रार केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार या बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या.
आमदार मिहिर कोटेचा यांच्या म्हणण्यानुसार, १५ मे २०२६ रोजी त्यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र देऊन नव्या बदल्यांच्या प्रस्तावाकडे लक्ष वेधले होते. या प्रस्तावात यापूर्वीच्या १६५ अभियंत्यांच्या बदल्यांच्या प्रस्तावातील सुमारे ५० टक्के अभियंत्यांचा पुन्हा समावेश करण्यात आल्याचे कोटेचा यांनी म्हटले आहे.
हा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आल्याची माहिती मिळाल्याचा दावा कोटेचा यांनी केला. आपल्या पत्राची दखल घेत महापालिका आयुक्तांनी प्रस्तावित बदली यादी रद्द केली होती, असेही म्हटले आहे.
https://www.prahaar.in/2026/09/02/the-next-48-hours-are-crucial-heavy-rainfall-warning-for-these-13-districts-in-maharashtra/
‘रेट कार्ड’ची माहिती असल्याचा दावा
दरम्यान, दोन ते तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची माहिती आपल्याला मिळाली असल्याचा दावा कोटेचा यांनी केला आहे. या कथित अनियमिततेशी संबंधित ‘रेट कार्ड’ची माहितीही आपल्याकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या माहितीची सत्यता तपासण्यासाठी कोटेचा यांनी ५ ऑगस्ट २०२६ रोजी अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करून संबंधित कागदपत्रे व माहिती मागितली होती. मात्र, पत्र देऊन जवळपास २६ दिवस उलटूनही त्यांना अद्याप उत्तर मिळालेले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
अतिरिक्त आयुक्त ढाकणेच्या भूमिकेवर संशय
मागविलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि संबंधित माहिती उपलब्ध झाल्यास अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये पुन्हा ‘कॅश फॉर ट्रान्सफर’चा प्रकार झाला आहे किंवा नाही, हे स्पष्ट होऊ शकते, असा दावा आमदार कोटेचा यांनी केला.
“बदल्यातील अनियमिततेसंदर्भात माझ्याकडे ‘रेट कार्ड’सह माहिती आहे. या संदर्भात मी महत्त्वाची माहिती मागितली आहे. मात्र, ती देण्यास होत असलेल्या विलंबामुळे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या भूमिकेबाबतचा संशय अधिक बळावला आहे,” असे कोटेचा यांनी म्हटले आहे.
मुख्य सचिवांकडे सखोल चौकशीची मागणी
विधानसभेच्या विद्यमान सदस्याने अधिकृतरीत्या मागितलेली माहिती देण्यास विलंब होणे ही गंभीर बाब असल्याचे कोटेचा यांनी मुख्य सचिवांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. अभियंत्यांच्या बदल्यांमधील संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या आरोपांमुळे महापालिका अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये नेमका काय प्रकार झाला, ‘रेट कार्ड’ची माहिती खरी आहे का आणि बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाले का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.