दिग्गज तंत्रज्ञान कंपनी ‘ॲपल’ने (Apple) आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर मोठा बदल केला असून टिम कूक (Cook) यांच्या जागी जॉन टर्नस यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. जॉन टर्नस (Ternus) यांनी पदाची सूत्रे हाती घेताच कंपनीने अमेरिकेच्या ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन’कडे (US SEC) सादर केलेल्या अधिकृत दस्तऐवजांमधून टर्नस आणि एक्झिक्युटिव्ह चेअरमन बनलेल्या टिम कूक यांच्या नव्या पगार पॅकेजचा खुलासा केला आहे. या चालू आर्थिक वर्षात नवे सीईओ जॉन टर्नस यांना सुमारे ५८ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ५५१ कोटी रुपये) मिळतील, तर नवी भूमिका स्वीकारणाऱ्या टिम कूक यांना सुमारे ४७ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ४४६ कोटी रुपये) मिळणार आहेत.
https://www.prahaar.in/2026/09/02/rush-for-konkan-trips-for-ganpati-5220-extra-msrtc-buses-pressed-into-service/
जॉन टर्नस यांच्या ५८ दशलक्ष डॉलर्सच्या पॅकेजमध्ये ३ दशलक्ष डॉलर्सचा वार्षिक मूळ पगार आणि पुढील आर्थिक वर्षासाठी ५५ दशलक्ष डॉलर्सच्या शेअर्सचा (Stock Awards) समावेश आहे. याव्यतिरिक्त, त्यांना आर्थिक वर्ष २०२६ साठी सुमारे २.५ दशलक्ष डॉलर्सचे अतिरिक्त शेअर्स मिळतील. टर्नस यांच्या २०२७ मधील एकूण शेअर्सपैकी ७५ टक्के हिस्सा हा ‘S&P 500’ मधील इतर कंपन्यांच्या तुलनेत ॲपलच्या कामगिरीवर आधारित (Performance-based) असेल, तर उर्वरित २५ टक्के हिस्सा पुढील चार वर्षांत टप्प्याटप्प्याने हस्तांतरित केला जाईल. यापूर्वी कंपनीत सिनिअर व्हीपी म्हणून काम करत असताना टर्नस यांना वर्षाला सुमारे २५ दशलक्ष डॉलर्स (२३७ कोटी रुपये) मिळत होते.
दुसऱ्या बाजूला, ॲपलचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून टिम कूक यांना २ दशलक्ष डॉलर्स वार्षिक पगार आणि २०२७ च्या आर्थिक वर्षासाठी ४५ दशलक्ष डॉलर्सचे शेअर्स मिळतील. कूक यांच्या शेअर्सपैकी ५० टक्के हिस्सा कामगिरीवर आणि ५० टक्के हिस्सा कालावधीवर आधारित असेल. सीईओ असताना टिम कूक यांचा मूळ पगार ३ दशलक्ष डॉलर्स होता आणि गेल्या वर्षी त्यांची एकूण कमाई ७४.३ दशलक्ष डॉलर्स इतकी होती, ज्यामुळे नव्या भूमिकेत त्यांच्या पगारात मोठी घट झाल्याचे स्पष्ट होते.
या शतकात ॲपलच्या सीईओ पदावर झालेला हा केवळ दुसराच बदल आहे. ऑगस्ट २०११ मध्ये ॲपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या निधनानंतर टिम कूक यांनी कंपनीची सूत्रे हातात घेतली होती. आपल्या १५ वर्षांच्या कार्यकाळात टिम कूक यांनी ॲपलचे बाजारमूल्य ३५० अब्ज डॉलर्सवरून तब्बल ४.५ ट्रिलियन डॉलर्सहून अधिक पोहोचवण्यात ऐतिहासिक योगदान दिले आहे. आता जॉन टर्नस यांच्या नेतृत्वाखाली ॲपल एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे.