Nashik District Consumer Council : ग्राहकांची अस्सल पैठणी खरेदी करताना होणारी फसवणूक रोखण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाने पैठणी साडीवर ‘बारकोड’ आणि ‘लोगो’ लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी ग्राहकहिताचा हा निर्णय जाहीर केला असून, नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे प्रत्येक अस्सल पैठणीवर विशिष्ट बारकोड असेल. ग्राहक तो स्कॅन करून साडी अस्सल आहे की बनावट, याची त्वरित पडताळणी करू शकतील. तसेच साडी विणण्यासाठी वापरलेला धागा (रेशीम/जर), पैठणी कोणत्या गावात विणली आहे आणि कोणत्या कुशल कारागिराने ती तयार केली, याचीही माहिती मिळणार आहे.
https://www.prahaar.in/2026/09/01/ministers-nitesh-rane-sangram-jagtap-and-mahesh-landge-are-hindu-leaders-who-must-continue-working-for-the-cause-of-hindutva-chief-minister-devendra-fadnavis-lauds-them/
फसवणुकीला बसणार आळा
सध्या बाजारात पॉवरलूमवर तयार झालेल्या ‘सेमी-पैठणी’ साड्या खऱ्या पैठणीच्या नावाखाली हजारो ते लाखो रुपयांना विकल्या जातात. या निर्णयामुळे ग्राहकांना अस्सल आणि बनावट पैठणीतील फरक ओळखता येणार असून फसवणुकीला आळा बसणार आहे. हातमागावरील अस्सल पैठणी तयार होण्यासाठी साधारण २० ते ३० दिवस किंवा त्याहून अधिक कालावधी लागतो. बारकोडमुळे थेट विणकराची माहिती उपलब्ध होणार असल्याने कारागिरांच्या कलेला योग्य मान आणि आर्थिक मोबदला मिळण्यासही मदत होईल.
https://www.prahaar.in/2026/09/01/nashik-municipal-corporation-launches-another-door-to-door-drive-against-dengue-and-malaria/
येवला पैठणीला मिळालेले जीआय तपासा
पैठणी खरेदी करताना ग्राहकांनी ‘पैठणी मार्क’ तसेच येवला पैठणीला (Yeola Paithani) मिळालेले भौगोलिक मानांकन (जीआय) तपासावे. ‘मार्क ऑफ रिअल पैठणी’ची पडताळणी करावी. तसेच पैठणीची मागील बाजू तपासताना अस्सल हातमाग पैठणीतील धागे नीटनेटके गुंफलेले असतात; गुंतागुंतीचे जाळे किंवा मोकळे धागे आढळत नाहीत. खरेदीचे पक्के बिल व हमीपत्र घ्यावे. ऑनलाइन अथवा ऑफलाइन खरेदी करताना अधिकृत सिल्क मार्क असलेल्या तसेच नामांकित आणि विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच पैठणी खरेदी करावी, असे आवाहन सुरेश पाटील यांनी केले आहे.