– कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर
मुंबई : आगामी कालावधीत होऊ घातलेल्या राज्यातील २२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिले आहेत. मुंबईतील ‘देवगिरी’ निवासस्थानी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आणि जय पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
https://www.prahaar.in/2026/08/31/nashik-news-special-measures-for-passenger-safety-on-the-samruddhi-mahamarg/
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, आगामी २२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर मुख्य समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वळसे पाटील आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवानुसार या सर्व जिल्ह्यांचे दौरे करून सखोल आढावा घेतील आणि एक सर्वसमावेशक आराखडा मर्यादित कालावधीत तयार करतील. तसेच, एसआयआर आणि बीएलओ संदर्भातील कामकाजाला गती देण्यासाठी नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून, त्यांच्या समवेत अनिल भाईदास पाटील हे सहसंयोजक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी येत्या २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे एक राज्यव्यापी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून आणि विशेषतः महानगरांमधून सुमारे ६०० ते ७५० प्रमुख निमंत्रितांना बोलावण्यात येणार आहे. या विचारमंथन शिबिरात तरुणाईचा (जेन-झी) मुद्दा आणि पक्षाच्या आगामी अजेंड्याबाबत व्यापक चर्चा केली जाणार असून, पक्षाचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विचारांची आणि वारशाची मोट बांधून तरुणांना जोडण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.
https://www.prahaar.in/2026/08/31/ashok-kharat-case-hearing-on-the-bail-application-of-the-fraudster-ashok-kharat-today/
मराठा आरक्षणाबाबत जुनी भूमिका कायम
– मराठा आरक्षण आंदोलनाबाबत बोलताना सुनील तटकरे यांनी सांगितले की, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका असून दिवंगत अजित पवार हयात असतानाही हीच भूमिका कायम ठेवली होती, असे त्यांनी नमूद केले.
– नाशिकमध्ये होणाऱ्या शिबिराविषयी विचारले असता ते म्हणाले, सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने संघटना वाढवण्यासाठी असे कार्यक्रम घेत असतात. नाशिक येथील या राज्यव्यापी शिबिरानंतर पक्ष संघटनेत आवश्यकतेनुसार फेरबदल केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.