कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या किनाऱ्यावरील एका शेतात एक छोटे खाजगी प्रशिक्षण विमान अचानक कोसळले. या अपघातात विमानातील पायलट आणि सह-पायलट या दोघांचाही मृत्यू झाला आहे. विमान वाहतूक नियमाक संस्था (DGCA) या घटनेची चौकशी करत आहे.
https://prahaar.in/2026/08/27/rule-change-from1st-september-lpg-price-lpg-ekyc-fd-bulk-deposit-itr-deadline/
नेमकं काय घडलं ?
हे विमान कानपूरमधील ‘गर्ग एव्हिएशन’ या विमान प्रशिक्षण केंद्राचे होते. गंगा बॅरेज भागात विमान कोसळल्याचा मोठा आवाज झाल्यानंतर आसपासच्या लोकांनी लगेच तिकडे धाव घेतली. स्थानिकांनी दोन्ही वैमानिकांना तातडीने विमानातून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातात जीव गमावलेल्या मुख्य पायलटला ३,००० तासांपेक्षा जास्त काळ विमान चालवण्याचा मोठा अनुभव होता. ते मूळचे गुजरातचे होते, तर सह-पायलट कर्नाटकातील रहिवासी होते. पोलीस सध्या त्यांची अधिकृत माहिती आणि नावे स्पष्ट करत आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ ताब्यात घेतले असून परिसराची घेराबंदी केली आहे. ‘DGCA’चे विशेष पथक लवकरच येथे पोहोचून अपघातामागील नेमके कारण काय होते (तांत्रिक बिघाड की इतर काही) याचा शोध घेईल.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृत वैमानिकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले असून, या कठीण प्रसंगात त्यांना धीर मिळो अशी प्रार्थना केली आहे.