मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना नैसर्गिक रंगांचा वापर करावा, तसेच मंदिर परिसरातील सर्व कामे दर्जेदार पद्धतीने करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत औंढा नागनाथ आणि नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिराच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आली. औंढा नागनाथ मंदिराच्या विकासासाठी १९३ कोटी ५५ लाख २० हजार ४७४ रुपये, तर कल्याणेश्वर मंदिरासाठी ७२.४९ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. पुण्याजवळील आंबेगाव येथील ‘शिवसृष्टी’ ऐतिहासिक थीम पार्कच्या चौथ्या टप्प्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. (CM Devendra Fadnavis)
औंढा नागनाथ परिसरात विविध विकासकामे
मंदिरातील नंदी मंडप, ओवरी, दर्शन बारी तसेच हरीहर तलाव आणि परिसरातील मंदिरांचे संवर्धन व जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. यासोबतच सीसीटीव्ही, रोषणाई, बाह्य विद्युतीकरण आणि उद्यान विकासाची कामे केली जाणार आहेत. भाविकांसाठी भक्तनिवास, २,५०० क्षमतेचा प्रतीक्षा कक्ष, दर्शन रांगेतील आवश्यक सुविधा आणि माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. मंदिराचे वैभव जपत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, दगडी बांधकामाच्या धर्तीवर परिसराचे सुशोभीकरण तसेच जुन्या मूर्तींसाठी संग्रहालय उभारण्याचेही नियोजन आहे. (CM Devendra Fadnavis)
https://prahaar.in/2026/08/27/pandharpurs-development-plan-will-be-finalized-only-after-taking-everyone-into-confidence-chief-minister-devendra-fadnavis/
कल्याणेश्वर मंदिरासाठी ७२.४९ कोटींचा आराखडा
नागपूरच्या ऐतिहासिक कल्याणेश्वर मंदिर परिसराच्या विकास आराखड्यालाही मंजुरी देण्यात आली. भाविकांची संख्या लक्षात घेऊन पार्किंगची व्यवस्था वाढवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यांत्रिक पार्किंगऐवजी साध्या पार्किंगला प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी केली. प्रस्तावित आराखड्यात हेमाडपंथी स्थापत्यशैलीनुसार सुशोभीकरण, सभामंडप, बहुउद्देशीय सभागृह, महाप्रसाद सुविधा, वेदशाळा, योगशाळा, प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि भाविकांसाठी विविध सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. (CM Devendra Fadnavis)
‘शिवसृष्टी’च्या चौथ्या टप्प्यासाठी ५० कोटी
आंबेगाव बुद्रुक येथे विकसित होत असलेल्या ‘शिवसृष्टी’ ऐतिहासिक थीम पार्कच्या चौथ्या टप्प्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेचा इतिहास आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. (CM Devendra Fadnavis)