मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी क्रीडा सुविधांचा विकास आणि व्यवस्थापन करणार आहे. अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, विलेपार्लेतील लोकमान्य टिळक गार्डन आणि अंधेरीतील डी.एन. नगर येथील सिमेंट गोडाऊन या तीन ठिकाणांचा त्यात समावेश असून, या जागांचे एकूण क्षेत्रफळ 14.11 एकर आहे. या तिन्ही जागांची मालकी मुंबई महापालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे (MHADA) कायम राहणार आहे. SVKMला या जागा मर्यादित कालावधीसाठी परवान्याने देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जागांचे कायमस्वरूपी हस्तांतरण संस्थेकडे झालेले नसल्याचे SVKMने स्पष्ट केले आहे.
https://prahaar.in/2026/08/26/lokmanya-tilak-terminus-subedarganj-special-train-to-now-run-as-amrit-bharat-express-in-regular-service-passengers-to-get-high-tech-amenities/
या प्रकल्पांतर्गत स्थानिक नागरिक, मुले आणि युवा खेळाडूंना अधिक चांगल्या क्रीडा सुविधा आणि व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. क्रिकेट, फुटबॉल, अॅथलेटिक्स, टेनिस, बास्केटबॉल, पिकलबॉल, स्केटिंग, स्क्वॅश तसेच इनडोअर जिम्नॅशियमसारख्या सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. या सुविधांच्या विकासासाठी लागणारा भांडवली खर्च, संचालन आणि देखभालीचा खर्च SVKM करणार आहे. अंधेरीतील क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त 40 ते 50 प्रमाणित प्रशिक्षक, क्रीडा अधिकारी, समन्वयक आणि शारीरिक शिक्षण शिक्षक नियुक्त करण्याचे प्रस्तावित आहे. SVKMच्या म्हणण्यानुसार, संस्थेच्या क्रीडा उपक्रमांमध्ये सध्या 148 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
https://prahaar.in/2026/08/26/tourists-from-nanded-stranded-due-to-floods-in-nepal-district-administration-issues-immediate-contact-numbers-for-assistance/
अंधेरीतील क्रीडा संकुल SVKMला थेट देण्यात आल्याचा दावा संस्थेने फेटाळला आहे. या प्रकल्पासाठी BMCने सप्टेंबर 2025मध्ये निविदा प्रक्रिया राबवली होती. सात संस्थांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला, तर चार संस्थांचा अंतिम मूल्यांकनासाठी विचार करण्यात आला. SVKMने एकूण महसुलातील 50 टक्के हिस्सा देण्याची सर्वाधिक बोली सादर केली असल्याचे संस्थेने म्हटले आहे. दरम्यान, या तीन जागांचे एकत्रित क्षेत्रफळ 16 एकर नसून 14.11 एकर असल्याचेही SVKMने स्पष्ट केले आहे. अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे क्षेत्रफळ 11.57 एकर, विलेपार्लेतील लोकमान्य टिळक गार्डनचे 0.92 एकर आणि डी.एन. नगरमधील जागेचे 1.62 एकर आहे.
https://prahaar.in/2026/08/26/new-direction-for-gadchirolis-development-set-to-emerge-as-a-green-steel-hub-chief-minister-devendra-fadnavis/
SVKMचे अध्यक्ष अमरीशभाई पटेल यांनी मुंबईत खेळाडूंना सातत्याने सराव आणि प्रशिक्षण घेता येईल, अशा दर्जेदार क्रीडा सुविधांची गरज अधोरेखित केली. “भारत 2036च्या ऑलिम्पिकचे तसेच इतर मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यासाठी केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर क्रीडा संस्कृतीही मजबूत करणे गरजेचे आहे. मुंबईतील तरुण खेळाडूंना चांगल्या सुविधा, सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शन मिळाले, तर त्यातून भविष्यातील विजेते घडू शकतात. याच उद्देशाने मुंबईतील एक लाख तरुणांपर्यंत जागतिक दर्जाची क्रीडा परिसंस्था पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी सांगितले. SVKMच्या माहितीनुसार, संस्थेने आतापर्यंत एकात्मिक क्रीडा परिसंस्था विकसित करण्यासाठी 100 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. मुंबईतील तरुणांना क्रीडा क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या सुविधांचा विकास करण्यात येणार असल्याचे संस्थेने म्हटले आहे.