MUMBAI : पुण्यातून मुंबईत यायचं, लोकलमध्ये महिलांना हेरायचं आणि फक्त शनिवारीच सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारायचा… चोरीची ही अनोखी पद्धत अवलंबणाऱ्या 65 वर्षीय महिलेला रेल्वे पोलिसांनी अखेर रंगेहात पकडलं आहे. अनघा जोशी असं या आरोपी महिलेचं नाव असून ती पुण्याची रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अनघा जोशी विशेषतः महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी पुण्याहून मुंबईत येत असे. शनिवारी चोरी करणं तिच्यासाठी ‘लकी’ असल्याचा तिचा समज होता. मुंबईतील लोकलमधील गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या आणि मंगळसूत्रांवर ती डल्ला मारत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा उलगडा दादर रेल्वे स्थानकावरील CCTV फुटेजमुळे झाला. 2 मे रोजी दादर स्थानकातून बोरीवली लोकल पकडताना एका 44 वर्षीय महिला बँकरच्या गळ्यातील सुमारे 67 हजार रुपयांची सोन्याची साखळी आणि पेंडंट चोरीला गेले होते. त्यानंतर 6 जून रोजी याच परिसरात एका महिला फायनान्स एक्झिक्युटिव्हचे सुमारे 89 हजार रुपयांचे मंगळसूत्र आणि सोन्याची साखळी चोरीला गेली.
https://prahaar.in/2026/08/18/implementation-of-the-maharashtra-freedom-of-religion-act-to-begin-from-raksha-bandhan/
दोन्ही घटनांचा तपास करताना पोलिसांनी CCTV फुटेज तपासले. दोन्ही घटनांमध्ये महिला डब्याजवळ एक वृद्ध महिला संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आली. पोलिसांनी तिच्यावर लक्ष ठेवले. तिसऱ्या महिला प्रवाशाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी अनघा जोशीला ताब्यात घेतलं. चौकशीत तिने यापूर्वीही चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याची कबुली दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मुंबईतून चोरलेले दागिने पुण्यात नेऊन सराफांकडे विकल्याचा आरोपही तिच्यावर आहे. पोलिसांनी पुण्यातील सराफांकडून चोरीचे दागिने जप्त केले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, कौटुंबिक अडचणींमुळे चोरीचा मार्ग स्वीकारल्याचा दावा तपासात समोर आल्याचं सांगितलं जात असलं, तरी त्याची स्वतंत्र पुष्टी होणे बाकी आहे.
https://prahaar.in/2026/08/18/two-snakes-enter-mannat-on-nag-panchami-one-safely-rescued-the-other-missing/
शनिवार ‘लकी’ मानून मुंबईत येणाऱ्या या महिलेची चोरीची पद्धत अखेर CCTV मुळे उघडकीस आली.