नवी दिल्ली : आगामी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आलेल्या या चमूमध्ये अनुभवी नेत्यांसोबतच तरुण चेहऱ्यांनाही मोठी संधी देण्यात आली आहे. या नव्या रचनेमध्ये प्रादेशिक समतोल राखण्यासोबतच महिला प्रतिनिधित्वावर विशेष भर देण्यात आला आहे.
स्मृती इराणींचे मुख्य संघटनेत पुनरागमन
या नव्या कार्यकारिणीतील सर्वात मोठा बदल म्हणजे माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे भाजपच्या केंद्रीय संघटन रचनेत झालेले दणकेबाज पुनरागमन! त्यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस (National General Secretary) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आपले स्थान कायम राखले असून त्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी कायम राहणार आहेत.
https://prahaar.in/2026/08/17/even-though-many-would-like-me-to-go-to-delhi-i-will-stay-right-here-in-maharashtra-says-cm-devendra-fadnavis/
महिला आणि अल्पसंख्याक प्रतिनिधित्वावर भर
भाजपच्या या नव्या कार्यकारिणीत महिला सक्षमीकरणाचा स्पष्ट प्रभाव दिसून येत आहे. पक्षामधील १३ राष्ट्रीय उपाध्यक्षांपैकी ६ पदे महिला नेत्यांना देण्यात आली आहेत. याशिवाय राष्ट्रीय सचिव पदी ४ महिलांची निवड करण्यात आली असून एक महिला सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळणार आहे. विशेष म्हणजे या कार्यकारिणीत मुस्लिम समुदायातील दोन नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
उपाध्यक्ष पदाची मोठी नावे आणि पक्षांतराचे पडसाद
पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या यादीत वसुंधरा राजे यांच्याव्यतिरिक्त उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथसिंग रावत, दिल्लीतून राम माधव, ओडिशातून बैजयंत जय पांडा, आंध्र प्रदेशातून डी. पुरंदेश्वरी, उत्तर प्रदेशातून रेखा वर्मा आणि पंजाबचे सरदार मनप्रीत सिंग बादल या दिग्गजांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, गुजरातच्या वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी, महाराष्ट्राच्या डॉ. भारती प्रवीण पवार, मध्य प्रदेशचे लालसिंग आर्य, कर्नाटकातील एम. नागराज, उत्तर प्रदेशातील तारिक मन्सूर आणि पश्चिम बंगालच्या मधुछंदा कर या वरिष्ठ नेत्यांनाही उपाध्यक्ष मंडळात स्थान मिळाले आहे. दरम्यान, आम आदमी पार्टीला (आप) रामराम ठोकणारे संदीप पाठक यांची थेट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती झाली आहे, तर संबित पात्रा यांच्याकडे ईशान्येकडील राज्यांच्या समन्वयकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
संघटनेचे मुख्य सूत्रधार आणि मीडिया टीम
भाजपच्या संघटन रचनेचा कणा मानले जाणारे बी. एल. संतोष हे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) म्हणून दिल्लीतून आपली जबाबदारी पुढे सुरू ठेवतील. त्यांना मदत करण्यासाठी मुंबईतून शिवप्रकाश आणि चंदीगडमधून सौदान सिंग यांची सह-सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, पक्षाची प्रसिद्धी आणि मीडिया रणनीती सांभाळण्यासाठी अनिल बलोजी यांची मीडिया समन्वयक म्हणून निवड झाली आहे. त्यांना आशिष उषा अग्रवाल, प्रदीप भंडारी आणि सिद्धार्थ यादव हे सह-समन्वयक म्हणून सहकार्य करतील. तसेच, सोशल मीडिया विभागाची धुरा दीपक म्हस्के यांच्याकडे सोपवण्यात आली असून, प्रीती गांधी, शिवानंद द्विवेदी, आलोक भट्ट आणि अरुण यादव हे सह-समन्वयक म्हणून त्यांना साथ देतील.