पुणे :आपण हॉटेलमध्ये खाण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी जातो. मात्र, कधी-कधी छोट्या-मोठ्या कारणांवरून तिथे वाद होतात. खरंतर असे वाद तिथेच मिटवून पुढे जाणे गरजेचे असते. पण पुण्यात अशाच एका क्षुल्लक वादाला धक्कादायक वळण मिळाले आहे. या वादातून झालेल्या हाणामारीत एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या घटनेची सध्या पुण्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
नेमकं काय घडलं जाणून घ्या ?
मिसळ खाताना चुकून पायावर पाय पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना गणेश पेठ परिसरात घडली. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवम राजेश परदेशी (वय 28) असे मृत तरुणाचे नाव असून वैभव किशोर साळुंखे (वय 24) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
https://prahaar.in/2026/08/11/allegation-of-killing-a-cat-by-throwing-it-off-a-building-in-ambernath-pankaja-munde-takes-note-instructs-police-to-take-action/
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम रिक्षाचालक होता, तर वैभव एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. दोघांचीही एकमेकांशी ओळख होती. 9 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवम गणेश पेठेतील डुल्या मारुती चौकाजवळील एका मिसळ केंद्रात गेला होता. यावेळी गर्दीत त्याचा पाय चुकून वैभवच्या पायावर पडला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
वाद वाढल्यानंतर वैभवने शिवमला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याच्या छातीवर, पोटावर आणि शरीराच्या इतर भागांवर मारहाण करण्यात आली. काही नागरिकांनी हस्तक्षेप करून दोघांना वेगळे केले. त्यानंतर शिवम घरी परतला.
घरी आल्यानंतर शिवमने छाती आणि पोटात दुखत असल्याचे आईला सांगितले आणि तो आराम करण्यासाठी झोपला. सायंकाळी सुमारे 7 वाजता त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला तातडीने केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याला मृत घोषित केले.
शवविच्छेदनानंतर शरीरातील अंतर्गत रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये वैभव शिवमला मारहाण करताना दिसून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरासखाना पोलीस पुढील तपास करत आहेत.