मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज, गुरुवारी नागरिकांसाठी खुला होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यासोबतच अंधेरी पश्चिम-मंडाले मेट्रो 2B मार्गिकेतील चेंबूर मेट्रो स्थानकाचेही उद्घाटन होणार आहे. या दोन्ही सुविधांमुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. ( Santacruz Chembur Link Road Phase 2)
https://prahaar.in/2026/08/12/a-patriotic-bollywood-song-that-became-a-sensation-78-years-ago-a-historic-masterpiece-immortalized-by-the-voice-of-mohammed-rafi-and-the-presence-of-dilip-kumar/
सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड विस्तारीकरण प्रकल्पांतर्गत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तीन उन्नत मार्ग उभारले आहेत. यापैकी दोन मार्ग यापूर्वीच वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. आता सुमारे 1.2 किलोमीटर लांबीचा वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स उन्नत मार्गही सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे वाकोला ते बीकेसी हा प्रवास अवघ्या 5 ते 10 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.
या मार्गाला डॉ. बाबासाहेब अंतराव भोसले उड्डाणपूल असे नाव देण्यात आले आहे. या मार्गामुळे बीकेसी आणि वाकोला परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच चेंबूर, कुर्ला, कलिना, वाकोला आणि बीकेसी या भागांदरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या वाहतूक व्यवस्थेलाही यामुळे बळ मिळणार आहे.
दरम्यान, चेंबूर मेट्रो स्थानक सुरू झाल्यानंतर मंडाले ते चेंबूर असा मेट्रो प्रवास करता येणार आहे. चेंबूर परिसरात मेट्रोची सुविधा उपलब्ध झाल्याने रेल्वे, मोनोरेल आणि मेट्रो यांच्यातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
या नव्या रस्ते आणि मेट्रो सुविधांमुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्त्वाचे मानले जात आहेत.