Shalarth ID Scam : तब्बल १६० कोटी रुपयांच्या ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याच्या तपासात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला नाशिकरोड पोलीस ठाण्यातच जप्त करून ठेवलेल्या शासकीय जावक नोंदवहीत संशयितांनी फेरफार केल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे, पोलीस ठाण्यात जप्त असलेल्या या रजिस्टरमध्ये संशयितांनी थेट बनावट नोंदी केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Shalarth ID Scam)
https://prahaar.in/2026/08/11/postal-stamp-on-yeola-paithani-released-by-president-droupadi-murmu/
शासकीय तिजोरीवर दरोडा
एसआयटीच्या तपासानुसार, शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकारी, खासगी शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, लिपिक आणि एजंट यांनी संगनमत करून कागदोपत्री शाळा आणि शिक्षक दाखवत शासकीय तिजोरीवर दरोडा टाकला आहे. संशयित मनोज पाटील याच्या माध्यमातून तीन शाळांशी संबंधित तब्बल ४८ कर्मचाऱ्यांच्या गैरव्यवहाराचा तपास समोर आला आहे. यामध्ये ‘स्वामी समर्थ माध्यमिक शाळा, पारोळा’ या प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या शाळेच्या नावाने तब्बल २१ बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या बनावट आयडीच्या माध्यमातून शासनाचा निधी लाटण्यात आल्याचा संशय आहे.(Shalarth ID Scam)
https://prahaar.in/2026/08/11/nashik-crime-news-girl-sexually-assaulted-first-grandmother-murdered-to-cover-up-the-incident/
बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखोंचे वेतन
दुसरीकडे, ‘श्री दत्त विद्यामंदिर’, पाटोदा येथील वरिष्ठ लिपिक संशयित राहुल पवार याच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्याने माजी मुख्याध्यापकासोबत संगनमत करून प्रत्यक्षात शाळेत कधीही काम न केलेल्या स्वतःच्या तीन चुलत भावांचे बनावट रुजू अहवाल तयार केल्याचे तपासात समोर आले आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल १८ लाख ९४ हजार रुपयांचे बेकायदेशीर वेतन उचलण्यात आल्याचे एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या शासकीय जावक नोंदवहीला पोलिसांनी जप्त करून नाशिकरोड पोलीस ठाण्यात ठेवले होते, त्याच रजिस्टरमध्ये संशयितांनी फेरफार केल्याचे समोर आले आहे. (Shalarth ID Scam)
https://prahaar.in/2026/08/10/nashik-crime-vehicle-returning-from-harihar-fort-chased-and-vandalized/
सीसीटीव्हीत धक्कादायक प्रकार कैद
संस्थाचालक व एजंट शरद दयाराम शिंदे याने आठ शाळांमधील ५१ बोगस कर्मचाऱ्यांची नावे जप्त केलेल्या जावक नोंदवहीत स्वतः लिहीली. हा सर्व प्रकार पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या बेकायदेशीर कामात अमळनेर येथील श्री शिवाजी हायस्कूलचा लिपिक संशयित अविनाश उर्फ पप्पू बळवंत पाटील याने त्याला मदत केल्याचा आरोप आहे. बेलगंगा टेक्निकल स्कूलचे उपाध्यक्ष संशयित रामकृष्ण पाटील, माजी मुख्याध्यापक कैलास सोनवणे, शिक्षक भूषण पाटील आणि शांताराम जाधव या चौघांनी जप्त केलेल्या जावक रजिस्टरच्या पान क्रमांक ९८ वर पोलीस ठाण्यातच बनावट नोंदी केल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे. (Shalarth ID Scam)
https://prahaar.in/2026/08/11/nashik-major-decision-by-trimbakeshwar-temple-regarding-vip-darshan/
अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून ते लिपिक आणि एजंटपर्यंत सर्वांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा संघटित गुन्हा केला असल्याचे एसआयटीच्या तपासातून समोर आले आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने सर्व संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. आता या १६० कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती नेमकी किती आहे आणि या संपूर्ण गैरव्यवहारात आणखी कोणकोण सहभागी आहेत, याचा एसआयटीकडून सखोल तपास सुरू आहे.