मुंबई : अंबरनाथ येथील रॉयल फ्लोरा फेज-2 परिसरात मांजरीला इमारतीच्या 12व्या मजल्यावरून खाली फेकून ठार केल्याचा आरोप असलेल्या घटनेची राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी ठाणे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत. (Ambernath )
26 जुलै रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमी आणि प्राणिमित्र संघटनांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. मांजरीच्या पिल्लाला इमारतीवरून खाली फेकण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा या प्रकरणात करण्यात आला आहे. या घटनेवर अद्याप कारवाई झाली नसल्याचा आरोप करत स्थानिक प्राणिमित्र संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती.
पंकजा मुंडे यांनी ठाणे पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्राण्यांवर होणारी क्रूरता कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी पत्रातून मांडली आहे.
https://prahaar.in/2026/08/11/is-iran-responding-to-us-airstrikes-with-hacking-is-iran-plotting-to-kill-us-citizens-through-brutal-means/
प्राण्यांना मारहाण करणे, त्यांना विनाकारण वेदना देणे किंवा अमानुषपणे इजा पोहोचवणे याविरोधात प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यात तरतुदी आहेत. या घटनेतही संबंधित कायद्यांनुसार कारवाई होऊ शकते का, याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे. ( animal protection)
पंकजा मुंडे यांनी पत्रात प्राण्यांच्या जीवाचे महत्त्व अधोरेखित करत अशा प्रकारची क्रूरता अक्षम्य असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात तातडीने योग्य ती कारवाई करून त्याची माहिती देण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
या पत्राची प्रत ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आणि समितीचे सदस्य सचिव यांनाही पाठवण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे आता प्राणीप्रेमींचे लक्ष लागले आहे.