Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर सर्वसंमती निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. जेन-झीबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या जे काही घडत आहे, त्यामागील तक्रारी आणि नाराजी खऱ्या आहेत. भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही अनेक सुधारणा करण्याची गरज आहे. त्या अपेक्षित वेगाने होत नसल्यामुळे या विषयावर चर्चा होते. त्यामुळे संवाद होणे आवश्यक आहे. संवादानंतरही प्रश्न सुटले नाहीत, तर पुढचा विचार करता येईल. माझा जेन-झीबाबतचा अनुभव असा आहे की, आम्ही त्यांच्या वयाचे होतो तेव्हा आमच्या पिढीचा स्वभाव वेगळा होता. मोठ्यांनी जे सांगितले ते आम्ही मान्य करत असू. फारसे प्रश्न विचारत नव्हतो. पण आजची जेन-झी आणि जेन-अल्फा पिढी प्रश्न विचारते. त्यांना प्रत्येक गोष्टीचे तर्कसंगत उत्तर हवे असते आणि त्यासोबत आपुलकीही हवी असते. नातेसंबंध नसतील, ओळख नसेल आणि कोणी प्रश्न विचारला, तर ‘तू कोण प्रश्न विचारणारा?’ अशी प्रतिक्रिया येऊ शकते. पण एकमेकांशी ओळख आणि विश्वासाचे नाते असेल, तर त्याच प्रश्नाचे उत्तर देण्याची तयारी असते. म्हणूनच संवाद महत्त्वाचा आहे. लोकशाहीतही हाच मार्ग आहे. इंग्रजीमध्ये याला ‘डिबेट’ म्हणतात; पण आपल्या परंपरेत याला ‘शास्त्रार्थ’ म्हणतात. शास्त्रार्थात केवळ वाद-प्रतिवाद नसतो, तर ‘पूर्वपक्ष’ आणि ‘उत्तरपक्ष’ असतो. प्रत्येक बाजूचा विचार केला जातो. प्रत्येकाची पाहण्याची दृष्टी वेगळी असल्याने प्रत्येक विषयाचे नवे पैलू समोर येतात. अनेक मते, अगदी परस्परविरोधी मतेही, एकत्र आली की सत्याचे अधिक व्यापक चित्र स्पष्ट होते. त्यामुळे अशा प्रकारचा संवाद आणि विचारविनिमय लोकशाहीत आवश्यकच आहे.”
“जेन-झीने आंदोलन करू नये, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. लोकशाहीत कोणत्या प्रकारे भूमिका मांडायची, काय करायचे आणि कसे करायचे, याचे मार्ग संविधानात स्पष्ट केले आहेत. आपल्याला संविधान देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दोन भाषणे जरी वाचली, तरी लोकशाहीत प्रश्न कसे मांडावेत आणि त्यासाठी कोणता मार्ग स्वीकारावा, याचे स्पष्ट मार्गदर्शन त्यातून मिळते. आपणही असा दृष्टिकोन ठेवला पाहिजे की, जेन-झी आवाज उठवत आहे, तो केवळ विरोधासाठी नाही. त्यांच्या काही वास्तविक अडचणी आहेत, म्हणून ते बोलत आहेत. त्या अडचणी दूर करणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रात होणारे आंदोलन हे कोणाच्या विरोधात नसावे. ते माझ्या किंवा तुमच्या विरोधासाठी नसून, व्यवस्थेतील त्रुटी दूर करून प्रणालीत सुधारणा घडवून आणण्यासाठी असावे. तेव्हाच परिस्थिती सुधारेल. माझ्या मते, संवाद आधीपासूनच सुरू झाला असता, तर नंतर प्रश्न इतका तीव्र झाला नसता. प्रश्न टोकाला जाण्याची वेळच आली नसती. जेव्हा एखादा विषय एवढा वाढतो, तेव्हा कुठेतरी काहीतरी कमी राहिली आहे, हे मान्य करावे लागते. ती चूक नेमकी कोणाची आहे, हा वेगळा विषय असू शकतो; पण काहीतरी उणीव राहिली आहे, हे निश्चित. ती दुरुस्त केली पाहिजे. माझे मत असेच आहे.
https://prahaar.in/2026/08/06/if-i-had-missed-the-shoot-i-would-have-been-working-non-stop-for-24-hours-for-kbc-a-salute-to-amitabh-bachchans-determination-even-at-the-age-of-83/
“जेन-झीतील तरुणांना एखाद्या देशाचे एजंट किंवा अशा प्रकारची विशेषणे लावणे योग्य नाही. ते आपलेच आहेत. ते आपल्या देशाची पुढची पिढी आहे. त्यामुळे त्यांच्याशी आपलेपणाने संवाद साधला पाहिजे. त्यांच्याशी एकत्र बसून बोलले पाहिजे. संवादासाठी आपलेपणा आवश्यक असतो. परस्परांमध्ये नाते असले पाहिजे आणि त्या नात्याची जाणीवही असली पाहिजे. तेव्हाच खरा संवाद घडतो. त्यांची भूमिका आपल्याला समजते आणि आपली भूमिका त्यांनाही समजते. जेन-झीबद्दल नकारात्मक समज निर्माण करणे मला अजिबात मान्य नाही. यापूर्वीही कोणत्याही संदर्भाशिवाय हा प्रश्न मला विचारला गेला, तेव्हाही मी हेच सांगितले होते आणि आजही तुमच्यासमोर तेच सांगत आहे. माझ्या मते, जेन-झी आणि जेन-अल्फा ही नवी पिढी सध्याच्या आमच्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक आहे. देशभक्ती आणि समाजसेवेचे प्रामाणिक आवाहन त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचते आणि ते त्याला सकारात्मक प्रतिसाद देतात.”
“आजची जेन-अल्फा आणि जेन-झी ही पिढी निरागस आहे. मात्र अनेकदा आंदोलनांच्या वेळी अशा निरपराध तरुणांवर लाठीमार होतो, पेलेट गनचा वापर होतो, अशा घटना समोर येतात. या सर्व घटनांकडे पाहताना त्या का घडल्या, त्यामागची कारणे काय होती, हे आधी समजून घ्यावे लागेल. यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण माहिती माझ्याकडे नाही. तुमच्याकडेही कदाचित संपूर्ण माहिती नसेल. त्यामुळे केवळ वरवरच्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. नेमकी गडबड कुठे झाली, हे वस्तुनिष्ठपणे तपासावे लागेल. मी आत्ता ठामपणे सांगू शकत नाही की नेमके काय झाले आणि का झाले, कारण माझ्याकडे त्याची पूर्ण आणि खात्रीशीर माहिती नाही. तुम्हीही जे सांगत आहात ते वाचलेल्या बातम्यांच्या आधारे सांगत आहात आणि मीही तेवढ्याच माहितीच्या आधारे बोलत आहे. आज सकाळी येताना काही विघातक घटक त्यात शिरले होते आणि त्यांचा भांडाफोड झाल्याची बातमी मी वाचली. मात्र ती माहिती कितपत खरी आहे, हे मला माहीत नाही. पण मला जर कोणावर विश्वास ठेवायचा असेल, तर मी जेन-झीच्या तरुणांवर विश्वास ठेवेन.”
https://prahaar.in/2026/08/06/150-png-gas-connections-at-mahalaxmi-dhobighat-an-end-to-the-use-of-wood-and-coal-a-step-towards-a-pollution-free-environment/
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे शिक्षण व्यवस्थेवरील मत
“शिक्षणात सुधारणा करण्यासाठी एखादा एकच उपाय पुरेसा ठरणार नाही. अनेक पातळ्यांवर एकाच वेळी काम करावे लागेल. सर्वप्रथम, शिक्षण हा व्यावसायिक व्यवसाय नाही. ती जीवनाची मूलभूत गरज आहे. त्यामुळे शिक्षण सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होईल, अशी व्यवस्था उभी राहिली पाहिजे. त्यासाठी शुल्कासह अनेक बाबींवर व्यापक विचार करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, शिक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. ज्याच्यावर जी जबाबदारी आहे, त्याने ती प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. जिथे उणिवा आहेत, त्या दूर केल्या पाहिजेत. आपण आपल्या स्तरावर काय करू शकतो, याचाही विचार आवश्यक आहे. अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गावातील शाळांची परिस्थिती सुधारली आहे. जिथे शौचालय, पिण्याचे पाणी किंवा इतर मूलभूत सुविधा नव्हत्या, तिथे स्थानिकांनी संसाधने उभी करून त्या उपलब्ध करून दिल्या. जवळच्या शहरातील दानशूर व्यक्तींची मदत घेऊन संगणकांसारख्या सुविधा शाळांपर्यंत पोहोचवल्या.
शिक्षणाचा आर्थिक भार हा केवळ सरकारवर टाकून चालणार नाही. ही आपल्या मुलांची शिक्षणव्यवस्था आहे. त्यामुळे समाजानेही त्याकडे लक्ष दिले पाहिजे. समाजाने जागरूक राहिले पाहिजे, तसेच आवश्यक ते सहकार्यही केले पाहिजे. समाजाचा असा सक्रिय सहभाग वाढला, तर शिक्षणातील सुधारणा अधिक वेगाने घडू शकतील. यासोबतच शिक्षकांचे प्रशिक्षणही अत्यंत महत्त्वाचे आहे. सुधारणा शिक्षकांपासून सुरू झाली पाहिजे. शिक्षक सक्षम झाले, तर त्यानंतर अभ्यासक्रमासह इतर सुधारणाही प्रभावीपणे करता येतील. अर्थात, या सर्व गोष्टी एकाच वेळी समांतरपणे घडल्या पाहिजेत.
मूलभूत विचार असा असला पाहिजे की, शिक्षण आपण पुढची पिढी घडवण्यासाठी देत आहोत; शाळा चालवण्यासाठी किंवा पैसा कमावण्यासाठी नव्हे. हा दृष्टिकोन स्वीकारला आणि समाजानेही त्यात सक्रिय सहभाग घेतला, तर शिक्षण व्यवस्था निश्चितच अधिक सक्षम होईल. मी तुम्हालाही एक सूचना करू इच्छितो. तुम्हाला (केंद्र सरकारला) सत्तेत १५ वर्षे झाली आहेत. आता तुम्हीही शिक्षण क्षेत्रात एखादा ठोस प्रकल्प हाती घ्या. समाजाला सोबत घेऊन शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले, तर या अभियानाला मोठी ताकद मिळेल. समाजाच्या सहभागामुळे शिक्षणातील सुधारणा अधिक व्यापक आणि परिणामकारक ठरतील.