Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद येथे बुधवारी सकाळी शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी शेततळ्यातून पाणी घेण्यास गेलेल्या दोन तरुण शेतकऱ्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे बाहदराबाद गावावर शोककळा पसरली असून दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेत दीपक रामचंद्र पाचोरे (वय ३३) आणि प्रशांत गीतराम पाचोरे (वय ३४) यांचा मृत्यू झाला आहे.
https://prahaar.in/2026/08/05/nashiks-udhamal-set-to-become-the-first-international-dark-sky-community-village/
नेमकं काय घडलं ?
दीपक पाचोरे आणि प्रशांत पाचोरे दोघेही शेती हा प्रमुख व्यवसाय करत असून आपल्या कुटुंबाचा आधार होते. माहितीनुसार, बुधवारी सकाळच्या सुमारास दोघेही शेतातील पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी शेततळ्यातून पाणी काढण्यास गेले होते. मात्र इथेच त्यांना काळाने घेरले. शेततळ्यावर गेल्यानंतर दीपक पाचोरे यांचा अचानक तोल गेला आणि ते पाण्यात पडले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दीपक यांना वाचविण्याच्या प्रयत्नात प्रशांत पाचोरे यांनी कोणतीही पर्वा न करता शेततळ्यात उडी घेतली. मात्र शेततळ्यात दुर्दैवाने बुडून त्यांचा मृत्यू झाला.
https://prahaar.in/2026/08/06/100-year-old-house-collapses-in-uttar-pradesh-6-members-of-the-same-family-die-one-in-critical-condition/
…अन् दोघेही घरी न परतल्याने शोधाशोध
बराच वेळ उलटूनही दोघेही घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. त्यामुळे प्रशांत पाचोरे यांच्या पत्नी यांनी त्यांचा शोध घेण्यासाठी शेताकडे निघाल्या. शेततळ्याजवळ पोहोचल्यावर त्यांना फवारणीचा पंप आणि इतर साहित्य तळ्यावर पडलेले दिसले. ही बाब पाहताच त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. त्यांनी तातडीने आरडाओरड करून गावकऱ्यांना बोलावले. दरम्यान, गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शेततळ्यात शोध सुरू केला. काही वेळाने प्रशांत पाचोरे हे बेशुद्ध अवस्थेत पाण्यात आढळून आले. त्यांना बाहेर काढून तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र दीपक पाचोरे यांचा काहीच शोध लागत नव्हता.
https://prahaar.in/2026/08/06/over-100-nsg-commandos-conduct-exercise-at-hinjawadi-it-park-special-mock-drill-lasts-5-hours/
शेततळ्यात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाला (Disaster Management Team) पाचारण करण्यात आले. शेततळ्याची खोली आणि पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने शोधकार्याला अडचणी येत होत्या. अखेर शेततळ्याचे पाणी कमी करण्यासाठी तळ्याचा बांध फोडण्यात आला. शोधमोहीमेनंतर दीपक पाचोरे यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. दोघांनाही तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले.
https://prahaar.in/2026/08/06/devendra-fadnavis-government-take-9-big-decisions-for-gen-z-for-damage-control-after-jantar-mantar-protes/
कुटुंबावर कोसळला दुःखांचा डोंगर
मृत प्रशांत पाचोरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. तर दीपक पाचोरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा तसेच आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे नातेवाईकांसह मित्रपरिवार आणि ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेने शेततळ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शेततळ्यांची संख्या वाढत असली, तरी त्यांच्याभोवती आवश्यक सुरक्षाव्यवस्था नसल्याने अपघातांच्या घटना घडत असल्याचे पुन्हा एकदा या घटनेतून दिसून आले आहे.