मुंबई : राज्यात ॲनालॉग (नॉन-डेअरी) पनीरच्या विक्री, साठवण आणि वापरावर पुढील एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) याबाबत आदेश जारी केला असून तो राजपत्रातही प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र, नियमानुसार तयार केलेल्या प्रमाणित दुग्धजन्य पनीरच्या विक्रीवर कोणतेही निर्बंध लागू नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Analog Paneer)
ॲनालॉग किंवा नॉन-डेअरी पनीर हे दिसायला पनीरसारखे असले तरी त्यामध्ये दुधातील स्निग्धांश किंवा दुग्धघन पूर्णतः अथवा अंशतः काढून त्याऐवजी वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश किंवा इतर दुग्धेतर घटकांचा वापर केला जातो. अशा उत्पादनाची ‘पनीर’ म्हणून विक्री किंवा ग्राहकांना सेवा देण्यास आता बंदी घालण्यात आली आहे. (Analog Paneer Ban)
https://prahaar.in/2026/08/04/shalarth-id-scam-office-bearers-of-the-shendurni-institution-also-under-the-scanner-in-the-shalarth-id-scam/
एफडीएच्या आदेशानुसार, पनीर हा अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रमाणित दुग्धजन्य पदार्थ आहे. त्यामुळे त्यात दुधातील स्निग्धांशाऐवजी इतर कोणत्याही दुग्धेतर घटकांचा वापर करून तयार केलेले उत्पादन ‘पनीर’ म्हणून विकता येणार नाही. अशा उत्पादनाला कायद्यानुसार ‘दुग्ध संदर्भातील ॲनालॉग’ मानले जाईल. (FDA Maharashtra)
या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालये, केटरर्स, क्लाऊड किचन आणि इतर अन्नसेवा आस्थापनांवर होणार आहे. अशा ठिकाणी ॲनालॉग पनीरचा वापर, साठवण, विक्री किंवा ग्राहकांना सेवा देण्यास मनाई करण्यात आली आहे. (Fake Paneer)
तसेच, पनीरचे उत्पादन, पॅकिंग, साठवण, वितरण किंवा विक्री करणाऱ्या सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके (लेबलिंग व प्रदर्शन) विनियम, 2020 नुसार आवश्यक माहिती पॅकेजवर स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही एफडीएने दिला आहे. (Dairy Products)