नवी दिल्ली : तुम्ही येत्या काही दिवसांत रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railway) बिहारमधील मोकामाजवळ गंगा नदीवर उभारण्यात आलेल्या नव्या ‘डबल-लाईन’ रेल्वे पुलाला मुख्य नेटवर्कशी जोडण्याचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी रेल्वेने २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ या १४ दिवसांच्या काळात तब्बल ८४५ रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. याअंतर्गत ३३८ गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत, तर ३८४ गाड्यांच्या मार्गात बदल (डायव्हर्ट) करण्यात आला आहे. याशिवाय ६७ गाड्या बदललेल्या स्टेशनवरून सुटतील आणि ५६ गाड्या निश्चित ठिकाणाआधीच थांबवल्या (शॉर्ट-टर्मिनेट) जातील.
दिल्ली-पटना-हावडा मार्गावरील गर्दी कमी होणार
पूर्व मध्य रेल्वेने (ECR) दिलेल्या माहितीनुसार, सध्या मोकामा येथे १९५९ मध्ये बांधण्यात आलेला ‘राजेन्द्र सेतू’ हा केवळ एकच पदरी (सिंगल-लाईन) रेल्वे पूल आहे. त्यामुळे या मार्गावर गाड्यांची प्रचंड वाहतूक कोंडी होते. ही क्षमता मर्यादा दूर करण्यासाठी आणि गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी नव्या पुलाचे काम वेगाने पूर्ण केले जात आहे. सन २०१५-१६ च्या रेल्वे बजेटमध्ये सुमारे १,४९१.४७ कोटी रुपये खर्च करून या दुहेरी मार्गाच्या पुलाला मंजुरी देण्यात आली होती. हा पूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर दिल्ली-पटना-हावडा या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील गर्दीचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल आणि गाड्यांची ये-जा सुरळीत होण्यास मोठी मदत मिळेल.
https://prahaar.in/2026/08/05/rbi-repo-rate-not-increase-relief-for-borrowers-inflationary-pressure-persists-yet-repo-rate-remains-unchanged-reserve-bank-of-india/
नवा पूल मुख्य रेल्वे नेटवर्कशी जोडला जाणार
हा नवीन दुहेरी रेल्वे पूल अप्पर हाथीदाह जंक्शन, ताल जंक्शन, रामपुर डुमरा, दिनकर ग्राम सिमरिया आणि बरौनी जंक्शन या प्रमुख रेल्वे स्थानकांशी जोडला जात आहे. या कामाचा सर्वाधिक फटका ३ ऑक्टोबर २०२६ रोजी बसण्याची शक्यता असून, या एकाच दिवशी तब्बल ३६ गाड्या रद्द राहतील. प्रभावित होणाऱ्या गाड्यांमध्ये कोलकाता-जयनगर एक्सप्रेस, अजमेर-भागलपुर एक्सप्रेस आणि गोरखपूर-रांची एक्सप्रेस यांसारख्या अनेक लांब पल्ल्याच्या प्रमुख गाड्यांचा समावेश आहे.
‘या’ राज्यांतील रेल्वे प्रवाशांवर होणार परिणाम; रेल्वेचे महत्त्वाचे आवाहन
या मेगा ट्रॅफिक ब्लॉकचा थेट परिणाम बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांवर होणार आहे. विशेषतः हावडा, पटना, कोलकाता आणि नवी दिल्ली या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मार्गांवर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या काळात प्रवास करण्यापूर्वी आपल्या ट्रेनची अचूक स्थिती (Train Status) रेल्वेच्या हेल्पलाइन किंवा ॲपवर नक्की तपासून घ्यावी. तात्पुरत्या स्वरूपात होणारी ही गैरसोय भविष्यात पूर्व भारतातील रेल्वे पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास गतिमान करण्यासाठी आवश्यक असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.