देवरुख : मुसळधार पाऊस, काळाकुट्ट अंधार, घनदाट जंगल आणि हिंस्त्र वन्यप्राण्यांची भीती. या सगळ्यावर मात करत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काल रात्री एका अत्यंत आव्हानात्मक मोहिमेवर विजय मिळवला. संगमेश्वर-देवरुख मुख्य वीजवाहिनीतील बिघाड शोधून, २-३ किलोमीटर पायी चालत जात, २०० मीटर लांबीच्या डोंगरावरील दरीतील तुटलेली तार जोडून रात्री ३:३० वाजता देवरुख शहरासह परिसरातील २० ते २५ गावांचा वीजपुरवठा यशस्वीरीत्या पूर्ववत केला.
दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ७:५६ च्या सुमारास संगमेश्वर ते देवरुख ही मुख्य विद्युत वाहिनी अचानक नादुरुस्त झाली. त्यामुळे देवरुख व साडवली उपकेंद्रांअंतर्गत येणाऱ्या देवरुख, पांगरी, आंगवली, हरपुडे, ताम्हाणे, कोसुब आणि साडवली या ११ केव्ही वाहिन्या बंद पडल्या. परिणामी संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. संगमेश्वर ते देवरुख वाहिनी ही २१ किलोमीटर लांब असून ती पूर्णपणे डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगलातून जाते. रात्रीच्या वेळी हा बिघाड शोधणे हे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर मोठे आव्हान होते. देवरुख शहर व ग्रामीण विभागाच्या जनमित्रांनी तात्काळ एकत्र येत तपासणी सुरू केली. नवनिर्माण कॉलेजच्या पाठीमागे लोवले पडेवाडी येथील घनदाट जंगलात मुख्य वायर तुटल्याचे निदर्शनास आले. मात्र, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्ता नव्हता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हातामध्ये विजेचे साहित्य घेऊन, झाडे-झुडपे तोडत आणि वाट काढत तब्बल ३ किलोमीटर जंगलातून पायी प्रवास केला.
https://prahaar.in/2026/08/03/bollywood-actor-prithvi-vazir-struggle-life-1992-film-dil-ka-kya-kasoor-with-star-actress-divya-bharti-but-career-was-ruined-by-one-contract/
तुटलेली वाहिनी ही दोन डोंगरांच्या टोकांना जोडणारी आणि अंदाजे २०० मीटर लांबीच्या गाळ्याची होती. पाऊस आणि अंधाराच्या भीषण परिस्थितीत, जीवाची पर्वा न करता महावितरण कर्मचाऱ्यांनी अत्यंत कौशल्याने पाहणी करून रात्री ३:३० वाजता ही तार जोडली. तार जोडताच संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत झाला आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या अत्यंत जोखमीच्या व आव्हानात्मक मोहिमेत देवरुख उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. प्रशांत राणे व सहाय्यक अभियंता श्री. रवींद्र खोत यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य व प्रधान तंत्रज्ञ: श्री. सुरेश बावधने, श्री. नंददीप दोरकडे, श्री. रोहन थरवळ तंत्रज्ञ: श्री. बाबू बोटके, श्री. सुप्रेश वेले, श्री. परेश खेडेकर, श्री. ओमकार लिंगायत, श्री. विक्रांत भोसले, श्री. अक्षय घाटकर, श्री. सुरज मुंडे, श्री. अभी कदम यंत्रचालक व वाहनचालक: श्री. अक्षय जोशी व श्री. रवी मिरगल यांच्या पथकाने मोलाची कामगिरी बजावली. संकटाच्या वेळी जीवाची पर्वा न करता जनतेला सेवेत तत्पर राहणाऱ्या महावितरणच्या या खऱ्या ‘जनमित्रां’चे संपूर्ण देवरूसह संपूर्ण
संगमेश्वर तालुक्यातून कौतुक होत आहे.