अमित साटम; शिवउद्योग स्थापन करून किती मराठी तरुणांना उद्योगधंदे दिले?
मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट तपासण्याची भाषा करणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पक्षाकडे एकही आमदार किंवा खासदार नाही. मुंबई पालिकेत केवळ सहा नगरसेवक निवडून आलेल्या राज ठाकरेंच्या स्वतःच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढण्याची आवश्यकता आहे, असा पलटवार मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी शनिवारी केला. विद्यार्थी आंदोलनावरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरेंचा समाचार घेताना साटम यांनी त्यांना ‘स्टँडअप कॉमेडियन’ची उपमा दिली.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना साटम म्हणाले, ‘शिवउद्योग’च्या माध्यमातून किती मराठी तरुणांना प्रत्यक्षात उद्योगधंदे मिळवून दिले, याचे उत्तर राज ठाकरेंकडे नाही. स्वतःच्या कामगिरीबद्दल काही न बोलता ते फक्त अभिनय करत टीका करतात. केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया आणि कौशल्य विकासाच्या अनेक योजना राबवून देशाची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर आणली आहे, त्यामुळे फालतू वक्तव्ये करण्यापेक्षा राज ठाकरेंनी गुणवत्तेवर चर्चा करावी, असे आव्हान साटम यांनी दिले.
https://prahaar.in/2026/08/01/possibility-of-permission-being-granted-for-pop-idols-during-this-years-ganeshotsav/
या वेळी साटम यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे ९० टक्के आमदारांचा विश्वास गमावून बसले. त्यामुळे त्यांचे पद, पक्ष आणि चिन्ह गेले. आता त्यांच्याकडे रोज टीका करण्याशिवाय काही उरलेले नाही. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणत्याही मुद्द्यावर बोलण्यासाठी ठोस तथ्ये उरलेली नसून, मिश्किल विधाने करून राजकारण चालवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका साटम यांनी केली.