Home ब्रेकिंग न्यूज Kolhapur News : किळसवाणा प्रकार! हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर; खवय्यांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ

Kolhapur News : किळसवाणा प्रकार! हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर; खवय्यांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ

0
Kolhapur News : किळसवाणा प्रकार! हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर; खवय्यांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ

कोल्हापूर : अन्न हे पूर्णब्रह्म मानले जाते, पण याच अन्नाच्या नावाने नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ खेळणारा एक अत्यंत किळसवाणा आणि संतापजनक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड शहरात उघडकीस आला आहे. माळ भाग परिसरातील एका हॉटेल चालकाने सर्व मर्यादा ओलांडत चक्क सार्वजनिक स्वच्छतागृहातील पाण्याचा वापर हॉटेलमधील कामांसाठी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या धक्कादायक घटनेमुळे कुरुंदवाडसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गुप्त पाईपलाईन अन् किळसवाणा उद्योग

माळ भाग परिसरातील या हॉटेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार अत्यंत गुप्तपणे सुरू होता. हॉटेल मालकाने शेजारीच असलेल्या सार्वजनिक शौचालयातील पाण्याच्या नळाला गुप्तपणे एक पाईपलाईन जोडली होती. या पाईपद्वारे स्वच्छतागृहातील अस्वच्छ पाणी थेट हॉटेलमध्ये ओढले जात होते आणि तेच पाणी ग्राहकांसाठी व विविध कामांसाठी वापरले जात होते. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या हा संशयास्पद प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन थेट भांडाफोड केला. कार्यकर्त्यांनी या किळसवाण्या प्रकाराचे पुरावे गोळा करत प्रशासनाला तातडीने पाचारण केले.

https://prahaar.in/2026/07/30/selling-vada-pav-wrapped-in-printed-paper-proves-costly-fda-takes-action/

हॉटेल चालकाला कारणे दाखवा नोटीस

सार्वजनिक स्वच्छतागृहातील पाण्याचा असा घातक वापर होत असल्याचे स्पष्ट होताच कुरुंदवाड नगरपरिषदेचे आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी तात्काळ हॉटेलची पाहणी करून या गंभीर निष्काळजीपणाबद्दल संबंधित हॉटेल मालकाला कडक नोटीस बजावली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या अशा बेजबाबदार हॉटेल मालकावर केवळ नोटीस देऊन न थांबता कडक कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

शहरातील सर्व हॉटेल्सच्या तपासणीची जोरदार मागणी

बाहेरून विकत आणून खाणाऱ्या खवय्यांच्या जीवाशी अशा प्रकारे खेळ केला जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड घबराट आणि संतापाचे वातावरण आहे. “बाहेर हॉटेलमध्ये नाश्ता किंवा जेवणासाठी जायचे तरी कसे?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या एका घटनेमुळे शहरातील इतर हॉटेल्समधील स्वच्छतेवर आणि पाण्याचा वापर कसा होतो यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन (FDA) तसेच नगरपरिषदेने कुरुंदवाड शहरातील सर्व लहान-मोठ्या हॉटेल्सची आणि खानावळींची तात्काळ आणि सखोल तपासणी करावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here