Home देश Food Safety : रंगीबेरंगी फ्रायम्स अन् पापड खात असाल तर सावधान! कर्करोग आणि किडनीचा मोठा धोका; तमिळनाडू अन्न सुरक्षा विभागाचा इशारा

Food Safety : रंगीबेरंगी फ्रायम्स अन् पापड खात असाल तर सावधान! कर्करोग आणि किडनीचा मोठा धोका; तमिळनाडू अन्न सुरक्षा विभागाचा इशारा

0
Food Safety : रंगीबेरंगी फ्रायम्स अन् पापड खात असाल तर सावधान! कर्करोग आणि किडनीचा मोठा धोका; तमिळनाडू अन्न सुरक्षा विभागाचा इशारा

चेन्नई : पापड, अप्पलम आणि तळलेले रंगीबेरंगी फ्रायम्स (Fryums) हे भारतात अतिशय आवडीने खाल्ले जाणारे अन्नपदार्थ आहेत. संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये किंवा जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी ते घरोघरी वापरले जातात. बाजारात अनेक प्रकारचे पापड आणि फ्रायम्स मिळतात, ज्यातील आकर्षक आणि रंगीबेरंगी फ्रायम्स खासकरून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भुलवतात. मात्र, हेच रंगीबेरंगी पापड तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. तमिळनाडूच्या ‘अन्न सुरक्षा विभागाने’ (Food Safety Department) एका सोशल मीडिया पोस्टद्वारे हे कृत्रिम रंगांचे पापड आणि फ्रायम्स न खाण्याचा कडक इशारा दिला आहे.

किडनीचे आजार अन् कर्करोगाचा धोका

अन्न सुरक्षा विभागाने स्पष्ट केले आहे की, अशा कृत्रिम रंगांचा (Artificial Colours) वापर करून तयार केलेले पापड किंवा फ्रायम्स सतत खाल्ल्यास पचनसंस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. एवढेच नाही तर यामुळे किडनी खराब होण्याचा आणि दीर्घकाळात कर्करोग (Cancer) होण्याचा मोठा धोका निर्माण होतो. या वर्षाच्या सुरुवातीला मदुराई येथील एका गोदामातून तब्बल २२ टन बेकायदेशीरपणे साठवलेले रंगीबेरंगी पापड आणि फ्रायम्स जप्त करण्यात आले होते. या कारवाईनंतर विभागाने ही विशेष सतर्कता जारी केली आहे.

https://prahaar.in/2026/07/30/soanm-wangchuk-sonam-wangchuk-who-was-on-a-hunger-strike-against-the-modi-government-has-now-praised-the-modi-government-know-what-exactly-happened/

पापडात कृत्रिम रंगांच्या वापरावर बंदी

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पापड किंवा त्याशी संबंधित कोणत्याही अन्नपदार्थांमध्ये कृत्रिम रंगांचा वापर करण्यावर कायद्याने बंदी आहे. असे केमिकलयुक्त रंग शरीरात गेल्याने भविष्यात कर्करोगासारखे गंभीर आजार जडू शकतात. “केवळ दिसायला आकर्षक दिसतात म्हणून तुम्ही हे रंगीबेरंगी अप्पलम विकत घेऊन खात आहात का? मग सावध व्हा! यातील रसायने तुमच्या पोटाच्या विकारांपासून ते थेट कर्करोगासारख्या आजारांना आमंत्रण देऊ शकतात,” असा स्पष्ट इशारा अन्न सुरक्षा विभागाने दिला आहे.

लहान मुलांवर होतोय वाईट परिणाम

अशा बनावट आणि कृत्रिम रंगांचा सर्वात मोठा फटका लहानांना बसत आहे. लहान मुले हे रंगीबेरंगी फ्रायम्स पाहून आकर्षित होतात आणि आवडीने खातात. मात्र, यातील सिंथेटिक (कृत्रिम) रंगांमुळे लहान मुलांमध्ये अॅलर्जी आणि त्वचेचे आजार उद्भवत असल्याचे समोर आले आहे.

पारंपरिक अन् नैसर्गिक पर्यायांकडे वळा!

रासायनिक फ्रायम्स ऐवजी निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. “आकर्षक दिसणाऱ्या विषारी फ्रायम्सऐवजी स्थानिक पातळीवर पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे तांदूळ आणि उडदाच्या डाळीचे नैसर्गिक पांढरे पापड खा,” असा सल्ला विभागाने दिला आहे. या जनजागृतीसाठी त्यांनी सोशल मीडियावर रंगीबेरंगी फ्रायम्स आणि साधे पांढरे पापड यांचा तुलनात्मक फोटोही शेअर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here