– आरोग्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन; इंधनाच्या कारणांवरून होणारे रुग्णांचे हाल थांबणार
मुंबई : “राज्यातील आरोग्य सेवा अधिक तंत्रस्नेही आणि पारदर्शक करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, रुग्णवाहिकांसाठी सुरू करण्यात आलेला ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ (Cashless Petrocard) उपक्रम हा या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या उपक्रमामुळे १०२ रुग्णवाहिका सेवांचे व्यवस्थापन अधिक सक्षम होऊन इंधनाच्या अभावी रुग्णांचे होणारे हाल थांबतील”, असा विश्वास सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी व्यक्त केला.
मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालयात गुरुवारी आयोजित एका कार्यक्रमात ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ उपक्रमाचे उद्घाटन आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील शासकीय वाहनांना वेळेत इंधन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आरोग्य सेवेला नवी दिशा देणारा हा अभिनव उपक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. या माध्यमातून हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) यांच्या सहकार्याने राज्यातील ३ हजार १९५ रुग्णवाहिकांना ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ दिले जाणार आहे. (Ambulance Petrocard)
कार्यक्रमाला आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त जगन्नाथ विरकर, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक सुनिता गोलाईत, प्रकल्प संचालक (ईएमएस) रवींद्र सावंत, उपसंचालक जयंत मुळे यांच्यासह एचपीसीएल कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे संचालक विजय कंदेवाड, राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले की, आरोग्य सेवा ही सर्वसामान्यांसाठी जीवनदायी व्यवस्था आहे. पेट्रोकार्डमुळे रुग्णवाहिकांच्या इंधन खरेदी व्यवस्थापनासह आर्थिक पारदर्शकता येईल, कामकाजातील अनावश्यक विलंब कमी होईल आणि संपूर्ण यंत्रणा अधिक उत्तरदायी बनेल. ( Maharashtra News)
१०२ रुग्णवाहिका सेवा सर्व रुग्णांसाठी उपलब्ध
– यापूर्वी १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा प्रामुख्याने माता व बालकांसाठी वापरली जात होती. मात्र, यापुढे ही सेवा सर्व रुग्णांसाठी मोकळी करण्यात येत आहे. या १०२ रुग्णवाहिका सेवेला अधिक प्रभावी व सक्षम करून १०८ रुग्णवाहिका सेवेला एक मजबूत पर्यायी व्यवस्था म्हणून उभारावे, अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी दिल्या.
– कोरोना काळातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या कामगिरीचा उल्लेख करत आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांनी सेवाभावाने काम करण्याचे आवाहन केले. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी त्यांनी आरोग्य आयुक्त, आयटी विभाग व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी मॉनिटरिंगच्या माध्यमातून नागरिकांना अधिक जलद व दर्जेदार आपत्कालीन आरोग्य सेवा देण्यासाठी शासन बांधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.