Home देश Dubai-Mumbai IndiGo Flight : दुबई-मुंबई विमानाचे राजकोटमध्ये इमर्जन्सी लँडिंग; कार्गो होल्डमध्ये धूर दिसल्याने धावपळ

Dubai-Mumbai IndiGo Flight : दुबई-मुंबई विमानाचे राजकोटमध्ये इमर्जन्सी लँडिंग; कार्गो होल्डमध्ये धूर दिसल्याने धावपळ

0
Dubai-Mumbai IndiGo Flight : दुबई-मुंबई विमानाचे राजकोटमध्ये इमर्जन्सी लँडिंग; कार्गो होल्डमध्ये धूर दिसल्याने धावपळ

नवी दिल्ली : दुबईवरून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मोठी खळबळ उडाली. उड्डाणादरम्यान विमानाच्या कार्गो होल्ड (मालवाहू भाग) क्षेत्रात धूर निघत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने तत्काळ प्रसंगावधान दाखवत गुजरातच्या राजकोट विमानतळावर विमानाचे आपत्कालीन (Emergency) लँडिंग केले.

१९४ प्रवासी सुखरूप बाहेर

इंडिगोच्या ‘6E 1452’ या विमानात एकूण १९४ प्रवासी प्रवास करत होते. राजकोट विमानतळावर धावपट्टीवर विमान सुखरूप उतरल्यानंतर तातडीने सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला किंवा कर्मचाऱ्याला इजा झालेली नाही, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.

https://prahaar.in/2026/07/27/am-a-street-fighter-dharmendra-pradhan-to-congress-mps-it-happens-remar/

विमानतळावर ‘फुल इमर्जन्सी’ घोषित

विमानात धूर निघत असल्याची माहिती मिळताच वैमानिकाने राजकोट विमानतळ नियंत्रण कक्षाशी (ATC) संपर्क साधून लँडिंगची परवानगी मागितली. या माहितीनंतर राजकोट विमानतळावर सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने ‘फुल इमर्जन्सी’ लागू करण्यात आली. अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका धावपट्टीवर सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

विमानतळ संचालकांची माहिती

या घटनेबाबत माहिती देताना राजकोट विमानतळाचे संचालक दिगंत बोरा म्हणाले, “दुबईहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाच्या कार्गो होल्ड परिसरात धूर आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विमानाचे राजकोटमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमान अगदी सुरक्षितपणे उतरले असून सर्व १९४ प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत.”

इंडिगोच्या सेवेबाबत माहिती

इंडिगो ही देशातील सर्वात मोठी खाजगी विमान कंपनी असून ती ८० हून अधिक देशांतर्गत आणि ३० हून अधिक आंतरराष्ट्रीय मार्गांवर विमानसेवा पुरवते. या कंपनीच्या ताफ्यात मुख्यत्वे ‘एयरबस A320’, ‘A321’ मालिका आणि ‘ATR 72-600’ बनावटीची विमाने समाविष्ट आहेत. सध्या या घटनेच्या कारणाचा सखोल तपास तांत्रिक पथकाकडून केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here