वेगवान गोलंदाज मयंक यादवची (Mayank Yadav) भेदक गोलंदाजी आणि सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या (Vaibhav Sooryavanshi) अवघ्या १८ चेंडूंतील तुफानी अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या टी-२० (T-20) सामन्यात झिम्बाब्वेचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
सामन्यात नाणेफेक (Toss) जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. वेगवान गोलंदाज मयंक यादवने आपल्या ४ षटकांत अवघ्या १८ धावा देत २ महत्त्वाचे बळी टिपले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले. त्याला प्रिन्स यादवने (२/१९) उत्तम साथ दिली. शिवम दुबे आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. झिम्बाब्वेकडून वेस्ली मधेवेरेने सर्वाधिक ३९ धावा केल्या, तर रायन बर्लने २६ धावांचे योगदान दिले. भारताच्या अचूक गोलंदाजीमुळे झिम्बाब्वेला २० षटकांत ७ बाद १२५ धावांवरच रोखता आले. या सामन्यातून भारताच्या अशोक शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण केले.
https://prahaar.in/2026/07/24/lovlina-borgohain-a-winning-start-for-india-first-medal-secured-thanks-to-lovlina-borgohain/
१२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. अभिषेक शर्मा अवघ्या १ धावेवर बाद झाला. मात्र, त्यानंतर आलेल्या वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची पिसे काढली. वैभवने अवघ्या १८ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने आपले झंझावाती अर्धशतक पूर्ण केले. तो ५० धावांवर बाद झाला, पण तोपर्यंत त्याने भारताचा विजय सुकर केला होता. क्रिकइन्फोने त्याला सामन्यातील ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’ म्हणून घोषित केले.
वैभव बाद झाल्यानंतर इशान किशनने २४ चेंडूंत ३५ धावांची उपयुक्त खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने संयमी फलंदाजी करत २४ चेंडूंत नाबाद २८ धावा केल्या, तर तिलक वर्माने नाबाद ६ धावा करत भारताला १३.२ षटकांत ३ बाद १२६ धावांवर पोहोचवून विजय मिळवून दिला.भारताने तब्बल ४० चेंडू राखून हा सामना सहज खिशात घातला. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझाराबानीने २ बळी घेतले, तर रिचर्ड नगारावाला १ बळी मिळाला.