राजकीय पक्षांना आंधळा पाठिंबा नको
मुंबई : “कोणाच्याही चिथावणीला बळी न पडता सोशल मीडियावरील ट्रेंडचे आंधळेपणाने समर्थन करू नका. आंदोलनात हिंसा होणे पूर्णपणे अयोग्य आहे”, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कन्या दिविजा फडणवीस यांनी केले आहे. ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रतिक्रिया देताना त्यांनी तरुणांना राजकीय पक्षांच्या जाळ्यात न अडकता सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक हक्क आहे. मात्र, आंदोलकांनी पोलिसांवर किंवा पोलिसांनी आंदोलकांवर कोणत्याही स्वरूपाची हिंसा करणे चुकीचे असून त्याला अजिबात थारा मिळता कामा नये. शैक्षणिक सुधारणांसाठी किंवा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या चळवळीला पाठिंबा देण्यास हरकत नाही; परंतु या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विशिष्ट राजकीय पक्षांना अथवा त्यांच्या विचारधारेला आंधळेपणाने पाठिंबा देऊ नका. अशा पक्षांचे खरे हेतू ओळखून सतर्क राहणे गरजेचे आहे, असे दिविजा फडणवीस यांनी म्हटले आहे.
https://prahaar.in/2026/07/23/mumbai-water-supply-relief-from-heavy-rainfall-water-stock-in-the-7-reservoirs-supplying-mumbai-reaches-69-74/
विरोधी पक्षांच्या भूमिकेवर भाष्य
लोकशाहीत विरोधी पक्षाच्या भूमिकेवर मत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांचे शत्रू बनून त्यांची बदनामी करण्यावर भर देण्याऐवजी देशहित लक्षात घेऊन विकासात्मक निर्णयांना सहकार्य केले पाहिजे. जोपर्यंत विद्यार्थ्यांचे हित केंद्रस्थानी आहे, तोपर्यंत आंदोलनात गैर काहीच नाही. मात्र, जेव्हा एखादे आंदोलन मूळ मुद्द्यावरून भरकटून धार्मिक किंवा राजकीय वळण घेते, तेव्हा त्यामागचे उद्देश पूर्णपणे बदलतात. त्यामुळे तरुणांनी कोणत्याही विचारधारेच्या जाळ्यात न अडकता योग्य ती सावधगिरी बाळगावी, असे आवाहन देखील दिविजा यांनी केले.