मुंबई : मुंबईतील (Mumbai) गरीब, गरजू रुग्णांना महापौरांच्या माध्यमातून आर्थिक निधीची मदत केली जात असून मागील प्रशासक काळामध्ये मंदावलेली ही प्रक्रिया आता जलदगतीने राबवली जाणार आहे. यासाठी महापौर वैद्यकीय सहायता कक्ष स्वतंत्रपण निर्माण केला जाणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून मुंबईतील गरीब आणि गरजू रुग्णांंचे अर्ज निकालात काढून त्यांना वैद्यकीय आर्थिक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या धर्तीवर आता महापौर वैद्यकीय निधी कक्षाची स्थापना केली जात आहे.
गोरगरीब जनतेला स्वत:चे वैद्यकीय उपचार करता यावे यासाठी महापौर निधीतून ५ ते २५ हजर रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून दिला जातो. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या गरीब रुग्णांकडून तथा त्यांच्या नातेवाईकांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननीनंतर महापौरांच्या मंजुरीनंतर निधी उपलब्ध करून दिला जातो.
https://prahaar.in/2026/07/22/maharashtra-weather-update-next-72-hours-crucial-for-maharashtra-pune-on-red-alert-heavy-rainfall-in-several-areas-including-kalyan-dombivli/
प्रशासक काळ संपल्यांनतर सुमारे ८०० ते ९०० अर्ज प्रलंबित होते. त्यानंतर महापौरपदी रितू तावडे (Ritu Tawde) यांनी पदाचा भार स्वीकारल्यानंतर रितू तावडे यांनी या सर्व जुन्या अर्जांची छाननी करून पात्र ठरलेले अर्ज निकालात काढले. त्यानुसार सध्या केवळ १२५ हून अधिक अर्ज आज महापौर निधीसाठी प्रलंबित आहे. मात्र,आता महापौर वैद्यकीय सहायता निधी कक्ष निर्माण करून त्यानुसार जास्तीत जास्त अर्ज निकालात काढून रुग्णांना वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी महापालिका सभागृहाच्या बाहेरील जागेत महापौरांच्या अभ्यागतांसाठी असलेल्या राखीव जागेत या महापौर वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना केली जाणार आहे. या कक्षाची स्थापना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवारी २२ जुलै २०२६ रोजी होणार आहे.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धर्तीवर महापौर वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना केली जाणार आहे.
नगरसेवकांच्या खानपान सेवेची जागा जाणार
महापालिका सभागृहाच्या बाहेरील जागेत जुन्या स्थायी समितीच्या जागेचा काही वापर महापौरांच्या अभ्यागतांसाठी केला जात आहे. याच्या शेजारील मोकळ्या जागेत महापालिका सभागृहाच्या दिवशी खानपानाची सेवा पुरवली जाते. सभागृहाच्या दिवशी नगरसेवक या खानपान सेवेचा लाभ घेत असतात आणि अभ्यागतांसाठी असलेल्या जागेमध्ये बसून याचा आस्वाद घेत असतात. परंतु आता याच जागेत महापौर वैद्यकीय सहायक निधी कक्ष स्थापन केला जाणार असल्याने महापालिका सभेच्या दिवशी नगरसेवकांची मोठी गैरसोय होणार असून तात्पुरती उपहार गृहासाठी जागाच नसल्याने त्यांना आता खानपान सेवाअभावी मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.